पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:45 IST2025-12-26T13:44:07+5:302025-12-26T13:45:24+5:30

या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Rajasthan Jaipur Stones pelted at police! 75 people including 12 women arrested; What exactly happened in Jaipur at midnight? | पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?

पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरजवळील चौमूं येथे मशिदीच्या अतिक्रमणावरून सुरू झालेला वाद हिंसक वळणावर पोहोचला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर दोन गटांमध्ये तणाव वाढला अन् पोलिसांवरदगडफेक करण्यात आली. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या वापराव्या लागल्या. याप्रकरणी सुमारे 75 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तणावपूर्ण वातावरणामुळे परिसरात इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.

अतिक्रमण हटवण्यावरून वाद

डीसीपी हनुमान प्रसाद मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौमूं येथील कलंदरी मशीद परिसरात अतिक्रमणासंदर्भात बराच काळ वाद सुरू होता. मशिदीबाहेर ठेवलेले दगड हटवण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद वाढला आणि गुरुवारी रात्री अचानक तणाव निर्माण झाला. एका पक्षाने स्वेच्छेने अतिक्रमण हटवले होते. मात्र, काही लोकांनी लोखंडी अँगल्स लावून ते पुन्हा कायमस्वरूपी उभारण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी हे संरचनात्मक साहित्य हटवण्यास सुरुवात करताच दगडफेक झाली. काही व्यक्तींनी पोलिसांवर दगडफेक सुरू केल्याने परिस्थिती चिघळली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसक झटापटीत अर्धा डझनहून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी कारवाई करत दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यात सुमारे डझनभर महिलांचाही समावेश आहे.

चौमूं बसस्थानक परिसर पोलिस छावणीत रूपांतरित

घटनास्थळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चौमूं बसस्थानक व आजूबाजूचा परिसर पोलिस छावणीत रूपांतरित करण्यात आला आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : पुलिस पर पथराव; जयपुर झड़प में 75 गिरफ्तार।

Web Summary : जयपुर में मस्जिद अतिक्रमण पर झड़प हिंसक हुई; पुलिस ने आंसू गैस का इस्तेमाल किया। 12 महिलाओं सहित 75 गिरफ्तार। तनाव के बीच इंटरनेट बंद; जांच जारी।

Web Title : Stone pelting on police; 75 arrested in Jaipur clash.

Web Summary : Jaipur clash over mosque encroachment turns violent; police used tear gas. 75 arrested, including 12 women. Internet suspended amid tension; investigation ongoing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.