इव्हेंटसाठी बोलावले अन्..; उदयपूरमध्ये महाराष्ट्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:41 IST2026-01-16T11:41:03+5:302026-01-16T11:41:13+5:30
पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.

इव्हेंटसाठी बोलावले अन्..; उदयपूरमध्ये महाराष्ट्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार
Rajasthan Crime: राजस्थानमधील पर्यटननगरी उदयपूरमध्ये समाजाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील एका तरुणीवर फार्महाऊसवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपी ताब्यात घेतला असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील रहिवासी असलेल्या पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारानुसार, हिरणमगरी परिसरातील करण सिंह याने तिला एका इव्हेंटच्या कामासाठी महाराष्ट्रातून उदयपूरला बोलावले. सुरुवातीला तिने नकार दिल्यानंतर अधिक मोबदल्याचे आमिष दाखवून तिला उदयपूरला आणण्यात आले.
उदयपूरला आल्यानंतर आरोपीने तिला सुखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर नेले. तेथे करण सिंह व त्याच्या साथीदारांनी दारू पार्टी केली. आरोपीने स्वतः दारू पिली आणि तरुणीलाही जबरदस्तीने दारू पाजल्याचा आरोप आहे. नशेच्या अवस्थेत आरोपी व त्याच्या एका साथीदाराने तरुणीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
इतर संशयितांची भूमिका
घटनेच्या वेळी फार्महाऊसवर आरोपीचे आणखी तीन साथीदार उपस्थित होते. त्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त करण्यात येत असून, तपासादरम्यान त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
एसपी कार्यालयात तक्रार, गुन्हा दाखल
पीडित तरुणीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार सुखेर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि तपासाची माहिती घेतली.
२३ दिवसांत दुसरी घटना, पोलीस यंत्रणेत खळबळ
विशेष म्हणजे, अवघ्या २३ दिवसांत उदयपूरमध्ये सामूहिक अत्याचाराचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी एका आयटी कंपनीतील अधिकाऱ्याशी संबंधित प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका महिलेचाही सहभाग असल्याचे आरोप होते. सलग दुसऱ्या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
पुढील कारवाई
पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.