यंदाच्या गणशोत्सवाची तिकीट बुकींग दुसऱ्या मिनिटालाच फुल झाली होती. अनेक वेळा आधीच तिकीटे संपतात. यामुळे गरजुंना ऐनवेळी प्रवासाला जाता येत नाही. याविरोधात गेल्या काही वर्षांपासून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात होती. यावर आता रेल्वेने १ जुलैपासून जबरदस्त तोडगा काढल्याचे दिसत आहे. जो पहिल्या दोन तीन दिवसांत तत्काळ तिकिटांवर भलताच लागू झाल्याचे दिसत आहे.
अनेक रेल्वे मार्गांची तत्काळ तिकीटे काही मिनिटांत नाही तर काही सेकंदांत संपत होती. रेल्वेच्या या बदलानंतर आता याच रेल्वे मार्गांची तिकीटे उपलब्ध असल्याचे दिसत आहे. दिल्लीहून वाराणसी, लखनऊ आणि बिहारला जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्यांची तिकीटे १०-१५ मिनिटे होऊनही उपलब्ध दिसत आहेत.
आता केवळ आधार ओटीपी ऑथेंटिकेशनद्वारेच तत्काळ तिकिटे बुक करता येणार आहेत. ही प्रणाली १ जुलैपासून लागू झाली आहे. तिचे परिणाम दिसू लागले आहेत. तत्काळ तिकिट बुकिंग अधिक पारदर्शक करणे आणि गरजू प्रवाशांना प्राधान्य देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या बदलामुळे बुकिंग विंडो उघडल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांपर्यंत एजंट तत्काळ तिकिटे बुक करू शकणार नाहीत. याचा फायदा सामान्य प्रवाशांना होणार आहे.
यामुळे ३० मिनिटांनंतर जी तत्काळ तिकीटे उपलब्ध असतील तीच एजंटांना मिळणार आहेत. एजंट बुकिंगसाठी देखील ओटीपी आधारित आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच जे प्रवाशी काउंटर किंवा एजंटद्वारे तिकिटे बुक करतील त्यांना देखील १५ जुलैपासून आधार ओटीपी अनिवार्य असणार आहे.
एजंटांच्या बदललेल्या वेळेमुळे एसी क्लासची तिकीटे सामान्य प्रवासी सकाळी १०:०० वाजेपासून, एजंट १०:३० नंतर बुक करू शकणार आहेत. तर नॉन-एसी क्लासची तिकीटे सामान्य प्रवासी सकाळी ११:०० वाजेपासून आणि एजंट ११:३० नंतर बुक करू शकणार आहेत.