राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:49 IST2025-11-05T14:48:26+5:302025-11-05T14:49:21+5:30
Rahul Gandhi H-Files PC: राहुल गांधींनी 25 लाख बनावट मतदार असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
Rahul Gandhi H-Files PC:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत 25 लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी मतदार याद्या दाखवत, एकाच व्यक्तीच्या नावे अनेक ठिकाणी मते पडल्याचा आणि बनावट नावांनी मतदार याद्या तयार केल्याचा आरोप केला. आता या सर्व आरोपांवर हरियाणा निवडणूक आयोगाची अधिकृत प्रतिक्रिया आली आहे.
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
‘H Files’ प्रेस कॉन्फरन्स
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘H Files’ नावाने पत्रकार परिषद घेत दावा केला की, “हरियाणामध्ये सुमारे 2 कोटी मतदारांपैकी 25 लाख मतदार बनावट आहेत. म्हणजेच प्रत्येक 8 पैकी 1 मत चोरी गेले आहे.” त्यांनी पत्रकार परिषदेत काही मतदार याद्यांचे फोटो दाखवत, एकाच फोटोवर वेगवेगळ्या नावाने मतदारांची नोंद असल्याचा आरोप केला.
Some Important Facts in respect of Haryana Assembly Elections 2024 pic.twitter.com/q66ZID485X
— Chief Electoral Officer, Haryana (@ceoharyana) November 5, 2025
निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर
हरियाणा निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांवर 15 मुद्द्यांत सविस्तर स्पष्टीकरण देत सर्व दावे पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. आयोगाने X वर पोस्ट करून राहुल गांधींचे दावे फेटाळले आणि सविस्तर माहिती दिली. आयोगाने स्पष्ट केले की, “राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन आहेत. निवडणुकीतील प्रत्येक प्रक्रिया (मतदार यादी तयार करणे, पडताळणी, आणि निकाल जाहीर करणे) पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि सर्व पक्षांच्या देखरेखीखाली झाली आहे.”
आयोगाने मांडलेले काही प्रमुख मुद्दे
- मतदार यादी 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.
- एसएसआर दरम्यान प्राप्त झालेल्या दाव्यांची आणि हरकतींची एकूण संख्या 416,408 होती.
- बीएलओंची एकूण संख्या: 20,629.
- अंतिम मतदार यादी 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.
- जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे ईआरओ विरुद्ध दाखल केलेल्या अपिलांची संख्या: शून्य
- जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांविरुद्ध सीईओकडे दाखल केलेल्या दुसऱ्या अपिलांची संख्या: शून्य
- मतदार यादी माघारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत अंतिम करण्यात आली आणि 16.9.2024 रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना सामायिक करण्यात आली.
- मतदान केंद्रांची एकूण संख्या: 20,632.
- निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या: 1,031
- सर्व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान एजंटांची एकूण संख्या: 86,790.
- मतदानानंतरच्या दिवशी छाननी दरम्यान उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची संख्या: शून्य
- मतमोजणीसाठी सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी एजंटांची संख्या: 10,180
- मतमोजणी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या तक्रारी/आक्षेप: 5
- निकाल 8.10.2024 रोजी जाहीर.
- निवडणुकीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकांची संख्या: 23