दिल्लीत भाजप खासदार व आमदारामध्ये राडा

By Admin | Updated: June 16, 2014 14:12 IST2014-06-16T14:12:04+5:302014-06-16T14:12:20+5:30

दिल्लीतील भाजपचे खासदार मनोज तिवारी आणि स्थानिक आमदार नरेश गौंड हे दोन्ही नेते भरकार्यक्रमात एकमेकांना भिडले. अखेरीस बाऊन्सर्सनी मध्यस्थी करुन दोन्ही नेत्यांमधील भांडण सोडवले.

Rada in BJP MP and MLA in Delhi | दिल्लीत भाजप खासदार व आमदारामध्ये राडा

दिल्लीत भाजप खासदार व आमदारामध्ये राडा

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १६- प्रशासकीय व्यवस्थेला शिस्त लावण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केले जात असतानाच दिल्लीत भाजपच्या काही नेत्यांच्या बेशिस्त व बेलगाम वागण्यामुळे पक्षाची नाचक्की झाली आहे. दिल्लीतील भाजपचे खासदार मनोज तिवारी आणि स्थानिक आमदार नरेश गौंड हे दोन्ही नेते भरकार्यक्रमात एकमेकांना भिडले. अखेरीस बाऊन्सर्सनी मध्यस्थी करुन दोन्ही नेत्यांमधील भांडण सोडवले. 
दिल्लीतील बाबरपूर येथे नवनिर्वाचित खासदार व अभिनेता मनोज तिवारी यांच्या सत्कारासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आमदार नरेश गौंड यांच्याकडे सोपवण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार मनोज तिवारी तब्बल तीन तास उशीराने पोहोचले.  यामुळे गौंड नाराज झाले. 'गेल्या महिनाभरापासून स्थानिक नेते खासदारांना शोधत आहेत. आज खासदार त्यांच्या भेटीला आले खरे पण तेदेखील तीन तास उशीरा' अशा शब्दात गौंड यांनी त्यांची नाराजी भाषणातून व्यक्त केली. निवडणुकीत मेहनत करणा-या नेते व कार्यकर्त्यांकडे आता मात्र दुर्लक्ष होते असा त्यांच्या म्हणण्याचा सूर होता. गौंड यांच्या विधानाने मनोज तिवारींचे समर्थक नाराज झाले व त्यांनी गौंड यांच्याकडील माईकच हिसकावून घेतला. यामुळे मंचावर गोंधळ निर्माण झाला व प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेले. दोन्ही नेत्यांचे समर्थक शिवीगाळ करत होते असे एका स्थानिक वृत्तपत्राने म्हटले आहे. अखेरीस मनोज तिवारींसोबत आलेल्या बाऊन्सर्सनी हे भांडण सोडवले. 
या घटनेविरोधात मी पक्षश्रेष्टींकडे तक्रार केल्याचे मनोज तिवारींनी म्हटले आहे. तर तिवारी विरोधी पक्षातील नेत्यांशी जवळीक वाढवत असल्याचा गंभीर आरोप गौंड यांनी केला आहे. आता या प्रकरणाकडे भाजप नेतृत्व काय भूमिका घेते हेच पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Rada in BJP MP and MLA in Delhi