गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 01:45 PM2017-12-19T13:45:04+5:302017-12-19T15:16:50+5:30

गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मोदींच्या विश्वासार्हतेची समस्या आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

Question on Modi's credibility due to Gujarat results says Rahul Gandhi | गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - राहुल गांधी

गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - राहुल गांधी

Next

नवी दिल्ली - गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मोदींच्या विश्वासार्हतेची समस्या आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. काँग्रेससाठी हा चांगला निकाल नसून गुजरातमध्ये भाजपाला जबरदस्त फटका बसला असल्याचा टोलाही राहुल गांधींनी लगावला. यावेळी त्यांनी विजयी झालेल्यांचं अभिनंदनही केलं. 


'आमच्यासाठी हा खूप चांगला निकाल आहे. ठीक आहे पराभव झाला, जिंकू शकत होतो. तिथे थोडी कमतरता राहिली', असं राहुल गांधी म्हणाले. 'तीन चार महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही गुजरातमध्ये गेलो तेव्हा काँग्रेस भाजपासोबत लढू शकत नाही असा दावा करण्यात आला होता. पण आम्ही मेहनत केली आणि निकाल तुमच्या समोर आहे. भाजपाला जबरदस्त फटका बसला आहे', असं राहुल गांधी म्हणाले. 


राहुल गांधी यांनी यावेळी नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलवरही टीका केली. 'गुजरात मॉडेलवर जनतेचा विश्वास नाही. मार्केटिंग आणि प्रचार चांगला आहे, मात्र आतमधून सर्व पोकळ आहे. प्रचारादरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ते देऊच शकले नाहीत', अशी टीका राहुल गांधींनी केली. 


'गुजरातच्या निकालाने भाजपा आणि मोदींना धडा शिकवला आहे. तुमच्यात जो क्रोध आहे तो तुमच्या कामी येणार नाही, आमचं प्रेम तुमचा पराभव करेल असं उत्तर जनतेने दिलं आहे', असा टोला राहुल गांधींनी लगावला. 'नरेंद्र मोदी सतत भ्रष्टाचारावर बोलत होते, पण नरेंद्र मोदींच्या निवडणुकीच्या भाषणात कुठेच विकास, नोटाबंदीचा उल्लेख नव्हता. राफेल आणि जय शाह प्रकरणावर मोदींच्या तोंडातून शब्द निघत नाही', अशी टीका राहुल गांधीनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.

हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.

Web Title: Question on Modi's credibility due to Gujarat results says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.