महामार्गांवरील प्रवासादरम्यानचा ‘नो नेटवर्क’चा त्रास आता संपणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 06:00 IST2026-01-07T06:00:12+5:302026-01-07T06:00:12+5:30
दूरसंचार व ‘ट्राय’ने हस्तक्षेप करावा : एनएचएआय

महामार्गांवरील प्रवासादरम्यानचा ‘नो नेटवर्क’चा त्रास आता संपणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करताना अनेकदा मोबाइल नेटवर्क गायब होण्याच्या समस्येमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आता कंबर कसली आहे.
महामार्गावरील एकूण १,७५० किलोमीटर अंतराच्या अशा ४२४ जागा चिन्हांकित करण्यात आल्या आहेत, जिथे मोबाइल नेटवर्क अजिबात उपलब्ध नाही. या ‘ब्लॅक स्पॉट्स’मध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी ‘एनएचएआय’ने दूरसंचार विभाग (डॉट) आणि ‘ट्राय’कडे (ट्राय) तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांना मिळणार अलर्ट
केवळ नेटवर्क सुधारणेच नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एनएचएआयने एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे किंवा जिथे मोकाट जनावरांचा वावर अधिक आहे, अशा क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच प्रवाशांच्या मोबाइलवर ‘फ्लॅश एसएमएस’ किंवा अलर्ट पाठवण्याच्या सूचना ‘ट्राय’ला देण्यात आल्या आहेत. हे अलर्ट मिळाल्यामुळे वाहनचालक आधीच सावध होतील आणि वेग मर्यादित ठेवून संभाव्य अपघात टाळता येतील.