"कितने हिडमा मारोगे, हर घर से निकलेगा"; प्रदूषणाविरोधी आंदोलनात नक्षलवादी कमांडरची स्तुती; दिल्लीत मोठा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:35 IST2025-11-24T13:01:07+5:302025-11-24T13:35:15+5:30
दिल्लीत वायू प्रदूषणाविरोधातील आंदोलनावेळी नक्षलवादी 'हिडमा अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.

"कितने हिडमा मारोगे, हर घर से निकलेगा"; प्रदूषणाविरोधी आंदोलनात नक्षलवादी कमांडरची स्तुती; दिल्लीत मोठा वाद
India Gate Protest: देशाची राजधानी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात रविवारी संध्याकाळी वायू प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या एका आंदोलनाला अचानक मोठे राजकीय वळण मिळाले. आंदोलनादरम्यान काही प्रदर्शनकर्त्यांनी नुकताच आंध्र प्रदेशात चकमकीत मारला गेलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा याचे समर्थन करणारे पोस्टर आणि घोषणाबाजी केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मावोद्यांनी बस्तर आणि बिजापूरमध्ये जनतेच्या विकासाचे मॉडेल लागू केल्याचेही म्हटलं. यावेळी पोलिसांवर पेपर स्प्रे वापरल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करत २३ हून अधिक लोकांना अटक केली.
'हिडमा अमर रहे'च्या घोषणा
माध्यमांच्या वृत्तानुसार, इंडिया गेटच्या सी-हेक्सागॉन परिसरात झालेल्या या आंदोलनादरम्यान प्रदर्शनकर्त्यांच्या हातात माडवी हिडमाचे चित्र असलेले पोस्टर दिसले. आंदोलकांनी 'कितने हिडमा मारोगे', 'हर घर से निकलेगा हिडमा' आणि "माडवी हिडमा अमर रहे" अशा घोषणा दिल्या. माडवी हिडमा (४४) हा एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर होता. १८ नोव्हेंबर रोजी तो आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता. काही पोस्टर्सवर हिडमाची तुलना आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्याशी करण्यात आली होती आणि त्याला 'जल, जंगल और जमीन'चा रक्षक असे संबोधण्यात आले होते.
पोलिसांवर हल्ला, २३ जण अटकेत
प्रदूषणाविरोधात आवाज उठवत असल्याचा दावा करणाऱ्या या आंदोलकांनी सुप्रीम कोर्टाने निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या जंतर-मंतरऐवजी इंडिया गेटवर बेकायदेशीररित्या आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स तोडून रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला असता, काही लोकांनी अचानक पोलिसांच्या दिशेने पेपर स्प्रे मारला. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला तीव्र जळजळ झाली. जखमी पोलिसांना तातडीने आरएमएल रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत कर्तव्यपथ आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर (FIR) दाखल केल्या. अटकेतील २३ जणांना दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येत आहे.
'नक्सलवादी विचारधारा' पसरवण्याचा आरोप
दिल्लीतील या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दिल्लीचे विकास मंत्री कपिल मिश्रा यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. त्यांनी आरोप केला की, प्रदूषण आंदोलनाच्या नावाखाली नक्षलवादी विचारधारा पुढे आणण्याचा हा प्रयत्न होता आणि अशा विचारधारेविरुद्ध हे योग्य उत्तर आहे."
दिल्ली कोऑर्डिनेशन कमिटी फॉर क्लीन एअर या संस्थेने हे आंदोलन आयोजित केले होते. त्यांनी सरकारवर कॉस्मेटिक उपाययोजनांचा आरोप करत, जंगलतोड आणि खाणकाम यांसारख्या विकास धोरणांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे मत मांडले होते.