सरकारी शाळांमधून सावरकरांचे फोटो हटवा, राज्य सरकारचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 15:21 IST2020-02-13T15:18:16+5:302020-02-13T15:21:28+5:30
सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापणार

सरकारी शाळांमधून सावरकरांचे फोटो हटवा, राज्य सरकारचा आदेश
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपा सतत आमने-सामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच राजस्थानमधीलकाँग्रेस सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राजस्थानमधील मु्ख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधीचे पत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. तसेच, ज्या शाळांमधून हे फोटो काढले जाणार नाहीत, त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही यामध्ये म्हटले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच, राज्यातील सरकारी शाळांमधून सावरकर आणि उपाध्याय यांचे फोटो काढू देणार नाही, असा इशाराही राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी दिला आहे.
या निर्णयावर राजस्थानचे माजी शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, "काँग्रेस सरकारला राज्यातील सरकारी शाळांमध्ये फक्त एकाच कुटुंबातील व्यक्तींचे फोटो लावायचे आहेत. मात्र, भाजपा हे कधीच सहन करणार नाही."
गहलोत सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, हे सर्व नेते भाजपाचे आदर्श असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच, हे नेते विद्यार्थ्यांसाठी आदर्श नसल्याचेही काँग्रेसचे मत आहे.
दरम्यान, काँग्रेसने पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या 'शिदोरी' या नियतकालिकातून सावरकरांवर टीका करण्यात आली आहे. शिदोरीतील एका लेखात तर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नाहीत माफीवीर आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपा समोरा-समोर येण्याची शक्यता आहे.
(सावरकरांबद्दल काँग्रेसनं जे लिहिलंय ते शिवसेनेला मान्य आहे का?; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा)