ईडीच्या कारवाईची भीती, अटकेची शक्यता, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नीला CM करण्याची केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:52 PM2024-01-01T19:52:36+5:302024-01-01T19:53:18+5:30

Jharkhand Politics: इंडिया आघाडीतील घटक पक्षांची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये अचानक राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

Political movements increase in Jharkhand, Kalpana Soren may replace Hemant Soren as Chief Minister | ईडीच्या कारवाईची भीती, अटकेची शक्यता, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नीला CM करण्याची केली तयारी

ईडीच्या कारवाईची भीती, अटकेची शक्यता, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्नीला CM करण्याची केली तयारी

इंडिया आघाडीतील घटक पक्षांची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये अचानक राजकीय हालचाली वाढल्या आहेत. नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी गांडेय विधानसभा मतदारसंघातील आमदार सर्फराज अहमद यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने सातवे समन्स बजावल्यानंतर अहमद यांनी दिलेला राजीनामा भविष्यात होणाऱ्या मोठ्या उलथापालथीचे संकेत देत आहे. सोरेन यांच्यासमोरील अडचणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कल्पना सोरेन यांच्याकडे त्यांचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. कल्पना सोरेन ह्या अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागेवरून लढू शकत नसल्याने गांडेय या खुल्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. 

सत्ताधारी पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर इडी किंवा राजभवनातून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केली गेली तर कल्पना सोरेन ह्या सत्तेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे येऊ शकतात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत कल्पना सोरेन ह्या विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चा पक्षामध्ये हेमंत सोरेन यांचा पर्याय म्हणून जोबा मांझी, चंपई सोरेन आणि सविता महतो यांच्या नावांचीही वेळोवेळी चर्चा होत आली आहे. 

मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र याबाबतचा पुढील घटनाक्रम हा ईडीकडून हेमंत सोरेन यांच्या होणाऱ्या चौकशीवर आणि पुढील कारवाईवर अवलंबून असेल. मात्र कुढलाही धोका टाळण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाने रणनीती आखली आहे. सरफराज अहमद यांनी दिलेल्या राजीनाम्याची कुणकुण झारखंड मुक्ती मोर्चाच्या इतर आमदारांसह नेत्यांनाही लागली नव्हती. आता अहमद यांना गिरीडिह लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. 

Web Title: Political movements increase in Jharkhand, Kalpana Soren may replace Hemant Soren as Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.