कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:11 IST2025-12-06T12:10:03+5:302025-12-06T12:11:17+5:30
भरधाव वेगातील त्यांची कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने हा भीषण अपघात घडला.

कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातून एका अत्यंत हृदयद्रावक रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. या भागात एका लोकायुक्त इन्स्पेक्टरचा कारमध्ये जिवंत जळून करुण अंत झाला आहे. भरधाव वेगातील त्यांची कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि आगीने इतके रौद्ररूप धारण केले की, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
कुटुंबाला भेटायला जाताना घात!
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना धारवाड जिल्ह्यातील अन्निगेरी शहराच्या बाहेरील परिसरात घडली. हावेरी येथील लोकायुक्त इन्स्पेक्टर पंचाक्षरी सलीमथ हे शुक्रवारी त्यांच्या आय-२० कारमधून गदगकडे जात होते. गदग येथे ते त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला निघाले होते. मात्र, अन्निगेरीच्या परिसरात त्यांची कार अचानक अनियंत्रित झाली आणि दुभाजकावर धडकली. या जोरदार धडकेनंतर कारमध्ये क्षणार्धात आग लागली.
दरवाजा अडकला अन्...
प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, धडक बसल्यानंतर कारचे दरवाजे लॉक झाले असावेत. त्यामुळे इन्स्पेक्टर सलीमथ यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली, मात्र आगीच्या भडक्यामुळे कोणीही गाडीजवळ जाऊ शकले नाही. नागरिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. दुर्दैवाने, इन्स्पेक्टर पंचाक्षरी सलीमथ यांचा कारमध्येच जळून मृत्यू झाला होता.
पोलिसांकडून कसून तपास सुरू
हावेरी लोकायुक्तमध्ये इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेल्या सलीमथ यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, कार अनियंत्रित का झाली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. अपघाताच्या ठिकाणाजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, जेणेकरून अपघाताच्या अचूक कारणांचा उलगडा होऊ शकेल.