रोज टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींनी शिकवला 'युतीचा धर्म'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:38 PM2019-01-01T19:38:12+5:302019-01-01T19:46:41+5:30

काँग्रेससोबत जाणाऱ्या प्रादेशिक पक्षांना ते खाऊन टाकतात. पण आमच्यासोबत जे येतात ते फुलतात, खुलतात, असंही मोदींनी सांगितलं. 

PM Narendra Modi Interview: Modi teach coalition dharma to uddhav thackeray | रोज टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींनी शिकवला 'युतीचा धर्म'

रोज टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींनी शिकवला 'युतीचा धर्म'

Next

नवी दिल्लीः 'चौकीदार चोर है', असं म्हणणाऱ्या राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळणारे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अगदी रोजच्या रोज सडकून टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज मोदींनी 'युतीचा धर्म' शिकवला. त्याचवेळी, प्रादेशिक पक्षांची भूमिका निश्चितच महत्त्वाची असल्याचं आवर्जून सांगत त्यांनी युतीची गरजही बोलून दाखवली.

एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक, पाच राज्यांमधील पराभव, राफेल करार, राम मंदिर, नोटाबंदी, महाआघाडी या महत्त्वाच्या विषयांवरील प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. 

'आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालेलं असतानाही आम्ही युतीच्या धर्माचं पालन केलं. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेतलं, सहमतीने निर्णय घेतले', याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले, 'राज्याचं वेगळं राजकारण असतं. आमच्या सोबत असलेल्या प्रादेशिक पक्षांनी मोठं व्हावं हीच आमचीही इच्छा आहे. त्यांच्या काही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. काही जणांना वाटतं की दबाव आणून फायदा होईल, तर काही जण चर्चेचा मार्ग स्वीकारतात. परंतु,  प्रादेशिक पक्षांचं महत्त्व मी ओळखतो. त्यांच्या महत्त्वाकांक्षाना महत्त्व द्यावंच लागेल.'

काँग्रेससोबत जाणाऱ्या प्रादेशिक पक्षांना ते खाऊन टाकतात. पण आमच्यासोबत जे येतात ते फुलतात, खुलतात, असंही मोदींनी सांगितलं. 


अयोध्या दौरा करून राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला थेट आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच्या जाहीर सभेत अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना चोर म्हणत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. ही टीका प्रदेश भाजपाच्या जिव्हारी लागली असून, उद्धव यांना योग्य वेळी उत्तर देण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच दिला आहे. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी आज त्यांना युतीचा धर्म शिकवल्यानं शिवसेनाही भाजपाची 'शाळा' घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या जुन्या मित्रांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडू शकते.


Web Title: PM Narendra Modi Interview: Modi teach coalition dharma to uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.