PM Modi on CM Revanth Reddy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनाच ऑफर दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींच्या जुन्या कामाचे कौतुक केल्यानंतर, पंतप्रधानांनीही त्यांना अत्यंत हसत-खेळत आणि मिश्किल शैलीत उत्तर दिले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जुन्या काळाची आठवण करून दिली. "जेव्हा केंद्रात मनमोहन सिंह पंतप्रधान होते आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी १० वर्षांत गुजरात मॉडेल विकसित केले होते. आज तेलंगणातील जनतेचीही हीच अपेक्षा आहे की, येत्या १० वर्षांत तेलंगणा मॉडेल तयार व्हावे, जेणेकरून २०३४ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकेल," असं रेवंत रेड्डी म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलरवर नेण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नात तेलंगणा १० टक्के योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांचे मिश्किल पण टोकदार उत्तर
रेवंत रेड्डींच्या या मागणीवर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आमचे रेवंतजी म्हणाले होते की आपण राजकीय बोलणार नाही, तर मी देखील राजकीय बोलणार नाही. पण एक नॉन-पॉलिटिकल सत्य सांगतो, १० वर्षांच्या काळात भारत सरकारने गुजरातला जेवढे दिले, तेवढे मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण, माझ्या माहितीनुसार, सध्या केंद्र सरकार तेलंगणाला गुजरातपेक्षा कितीतरी जास्त पटीने पैसे आणि निधी देत आहे. जर मी जुन्या हिशोबाने गुजरात इतकाच निधी दिला, तर आता तुम्हाला जेवढे पैसे मिळतात ते अर्धेच होतील."
पंतप्रधान मोदी हसत पुढे म्हणाले की, "तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे, तिथे तुम्ही पोहोचू शकणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी चांगलं हेच आहे की, माझ्याशीच जोडले जा (माझ्यासोबतच या)." पंतप्रधानांच्या या उत्तराने सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.
तेलंगणासाठी विकासकामांची भेट
पूर्वी आंध्र प्रदेशाला १,००० कोटींपेक्षा कमी रेल्वे बजेट मिळायचे, आता केवळ तेलंगणाला ५,५०० कोटी रुपये मिळत आहेत. ५० हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प सध्या राज्यात सुरू आहेत. तसेच गेल्या ११ वर्षांत तेलंगणातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे दुप्पट झाले असून, त्यावर १.७५ लाख कोटी रुपये खर्च केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी वारंगलमध्ये १७०० कोटी रुपयांच्या काकतीय मेगा टेक्सटाइल पार्कचे उद्घाटन करण्यात आले.
ऊर्जा बचतीचे आवाहन
जागतिक स्तरावर, विशेषतः पश्चिम आशियातील संकट लक्षात घेता, पंतप्रधानांनी पेट्रोलियम उत्पादनांचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले. "आयात केलेल्या पेट्रो उत्पादनांचा वापर गरजेनुसारच व्हायला हवा, यामुळे परकीय चलनाची बचत होईल आणि युद्धाचे परिणाम आपल्यावर कमी होण्यास मदत होईल," असे ते म्हणाले.
Web Summary : PM Modi offered support to Telangana CM Revanth Reddy for state development, promising funds potentially exceeding Gujarat's past allocations. He urged mindful petroleum usage amid global uncertainties and inaugurated projects worth ₹9,400 crore.
Web Summary : पीएम मोदी ने तेलंगाना के सीएम रेवंत रेड्डी को राज्य के विकास के लिए समर्थन की पेशकश की, गुजरात के पिछले आवंटन से अधिक धन का वादा किया। उन्होंने वैश्विक अनिश्चितताओं के बीच पेट्रोलियम का उपयोग सावधानीपूर्वक करने का आग्रह किया और ₹9,400 करोड़ की परियोजनाओं का उद्घाटन किया।