VIDEO: बॅरल रोल करताना तेजसचा अपघात; कमी उंचीमुळे पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न ठरला निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:37 IST2025-11-22T16:31:35+5:302025-11-22T16:37:13+5:30
दुबईत कवायती करत असतानाच भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला.

VIDEO: बॅरल रोल करताना तेजसचा अपघात; कमी उंचीमुळे पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न ठरला निष्फळ
Tejas Crashes in Dubai:दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळून विंग कमांडर नमन स्याल यांना वीरमरण आलं. या घटनेचे अखेरच्या क्षणांचे नवीन व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. डब्ल्यूएल टॅनच्या एव्हिएशन व्हीडिओजने पोस्ट केलेल्या या क्लिपमध्ये वैमानिकाने जीव वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी पॅराशूटद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असावा, मात्र कमी उंचीमुळे आणि वेळेअभावी तो प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
या व्हिडिओत तेजस विमानाचा अपघात नेमका कसा झाला हे दिसत आहे. व्हिडिओमध्ये, विमान जमिनीवर आदळून आगीचा मोठा गोळा होताना दिसत असताना, ४९ ते ५२ सेकंदांच्या दरम्यान एक पॅराशूटसारखी वस्तू बाहेर पडताना दिसते. विमान कोसळण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी वैमानिकाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पुरेसा वेळ किंवा तेवढी उंची मिळाली नाही. त्यामुळे, विमान जमिनीवर आदळताच मोठा स्फोट होऊन आगीचा लोळ उठला आणि विंग कमांडर स्याल यांचा मृत्यू झाला.
अपघातापूर्वीची हवाई कसरत
अपघातग्रस्त तेजस लढाऊ विमान दुबई एअर शोमध्ये अत्यंत कमी उंचीवर धोकादायक ॲक्रोबॅटिक कसरती करत होते. एअर शो पाहणाऱ्या एका प्रेक्षकाने शूट केलेल्या या नवीन व्हिडिओमध्ये तेजस विमान बॅरल रोल ही कसरत करत असल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये विमान वळून पुन्हा वर येते. मात्र, खाली कोसळण्यापूर्वी विमान निगेटिव्ह-जी टर्न घेत होते आणि त्या वेळी त्याची उंची अत्यंत कमी होती. त्यामुळे ते थेट खाली कोसळले.
१० वर्षांच्या सेवेत तेजसमुळे झालेली ही पहिलीच जीवितहानी आहे. यापूर्वी मार्च महिन्यात जैसलमेरजवळ तेजसचा अपघात झाला होता, तेव्हा वैमानिकाने सुरक्षितपणे इजेक्ट केले होते. हा अपघात अत्यंत कमी उंचीवर झाल्यामुळे वैमानिकाला विमानाला स्थिर करण्याची किंवा उंची मिळवण्याची संधी मिळाली नाही, असे विमानतज्ञ सांगत आहेत.
हिमाचल प्रदेशच्या कांगरा येथील रहिवासी असलेले विंग कमांडर नमन स्याल यांच्या मागे त्यांची पत्नी (सेवानिवृत्त विंग कमांडर) आणि सात वर्षांची मुलगी आहे. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. अपघागामागचे नेमके कारण शोधण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.