VIDEO: जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या कारमधून तरुणाला खेचले बाहेर; फिल्मी स्टाईल रेस्क्यू करत तरुण बनला देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:44 IST2025-11-28T10:30:38+5:302025-11-28T10:44:35+5:30
उत्तर प्रदेशात एका कारचा विचित्र अपघात झाल्यानंतर चालकाला वाचवण्यात यश आलं.

VIDEO: जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या कारमधून तरुणाला खेचले बाहेर; फिल्मी स्टाईल रेस्क्यू करत तरुण बनला देवदूत
UP Car Accident: उत्तर प्रदेशातील पीलीभीतशहराच्या मध्यभागी असलेल्या टनकपूर हायवेवर गुरुवारी सकाळी एक थरारक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातील प्रमुख गौहनिया तलावाजवळ एक भरधाव अर्टिगा कार अचानक अनियंत्रित होऊन पाण्यात कोसळली आणि बुडू लागली. कारमध्ये शिवम नावाचा तरुण अडकला होता आणि त्याच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. मात्र बऱ्याच प्रयत्नानंतर या तरुणाला वाचवण्यात यश आलं.
या धोकादायक परिस्थितीतही क्षणाचाही विलंब न लावता, तलावात मासेमारी करत असलेल्या एका नाविकाने आणि हायवेवरून जात असलेल्या दिनेश कुशवाहा नावाच्या एका तरुणाने आपला जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घेतली. हे बचाव कार्य एखाद्या फिल्मी दृश्यापेक्षा कमी नव्हता. कार काही मिनिटांतच पाण्यात पूर्णपणे बुडत होती आणि आत अडकलेला चालक मदतीसाठी धडपडत होता. जमावाने आरडाओरड सुरू केली, पण कोणीही पुढे सरसावत नव्हते. याचवेळी, मासेमारी करणारा तरुण आणि दिनेश धाडस दाखवत बुडणाऱ्या कारपर्यंत पोहचले.
नाविकाने पूर्ण ताकद लावून कारच्या काचेजवळून आत झुकून बुडत असलेल्या शिवमचा हात पकडला आणि त्याला पाण्याबाहेर खेचले. त्याच वेळी, दिनेशनेही पाण्यात उडी मारून नाविकला मदत केली आणि जखमी चालकाला सुरक्षितपणे किनाऱ्यापर्यंत आणले.
देवदूत बनून आला नाविक आणि दिनेश
जखमी चालक शिवमची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोन तरुणांच्या अतुलनीय शौर्याचे आणि वेळेवर दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सीओ सिटी दीपक चतुर्वेदी यांनी सांगितले.
#पीलीभीत
— Raj Verma (@Raj_vermapbt) November 27, 2025
अनियंत्रित होकर गौहनिया तालाब में जा गिरी अर्टिगा कार।जान पर खेलकर कार में सवार व्यक्ति को बाहर निकल गया जिसे उपचार के लिए जिला अस्पताल भेजा गया है।पहले भी इस तालाब में वहुत सी घटनाएं घट चुकी हैं।मौके पर पहुंची कोतवाली पुलिस #pilibhitpic.twitter.com/9huOZOpWb7
दरम्यान, या घटनेनंतर गौहनिया तलावाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील मध्यभागी असूनही, या तलावाच्या बाजूला कोणतीही बॅरिकेडिंग, फेंसिंग लावलेला नाही. स्थानिक रहिवासी आणि नगरसेवकांनी अनेक वर्षांपासून सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, परंतु पालिका आणि जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.