किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा मृत्यू; मृतदेह लपवून पैसे लुटले, ICU मध्ये घुसताच डॉक्टर फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:32 IST2025-09-26T17:30:02+5:302025-09-26T17:32:52+5:30
बिहारमध्ये रुग्णालयाच्या आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा मृत्यू; मृतदेह लपवून पैसे लुटले, ICU मध्ये घुसताच डॉक्टर फरार
Bihar Crime: बिहारमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात किडनी स्टोनसाठी शस्त्रक्रिया करायला गेलेल्या एका तरुणाचा ऑपरेशन थिएटरमध्येच मृत्यू झाला. संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला आणि ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताच्या पत्नीच्या विनंतीवरून पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टरविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि तपास सुरू केला.
मोतिहारीच्या रुग्णाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. एका मोठ्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे ऑपरेशन केले, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केला. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबाकडून लाखो रुपये उकळून मृतदेह लपवून ठेवण्याचा घृणास्पद कट रचण्यात आला. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून आणि रुग्णालयाविरुद्ध आंदोलन करण्यात आलं.
मृत व्यक्तीचे नाव परवेझ असून तो नगरसेवक शायरा खातून यांचा जावई होता. परवेझ परदेशात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता आणि काही दिवसांपूर्वीच तो घरी परतला होता. किडनी स्टोनची तक्रार केल्यानंतर तो स्वतः गाडी चालवून रुग्णालयात गेला. डॉक्टर तबरेज यांनी बाहेरून तज्ज्ञ बोलावण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले, परंतु ऑपरेशन स्वतःच केले. चार तास चाललेल्या या ऑपरेशन दरम्यान वारंवार पैसे आणि औषधे मागितली जात होती.
कुटुंबाला संध्याकाळपर्यंत रुग्णाला भेटण्याची परवानगी नव्हती. जेव्हा ते जबरदस्तीने आयसीयूमध्ये गेले तेव्हा त्यांना परवेझ मृतावस्थेत आढळला. तिथे कोणताही डॉक्टर किंवा कर्मचारी नव्हता. यानंतर कुटुंबिय संतापले आणि त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी कुटुंबाची तक्रार घेऊन शवविच्छेदन करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर, डॉक्टरांनी रुग्णाला रक्त कमी पडत असल्याचे सांगितले आणि प्लाझ्माच्या तीन युनिट्सची तात्काळ व्यवस्था करण्यास सांगितले. संध्याकाळी ५ वाजता, जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी रुग्णाला भेटण्याची विनंती केली, तेव्हा सर्व डॉक्टर रुग्णाला सोडून पळून गेले होते.