'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:41 IST2025-12-01T12:37:06+5:302025-12-01T12:41:11+5:30
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 'ड्रामा' आणि 'डिलिव्हरी' या शब्दांवरून शाब्दिक तणाव निर्माण झाला.

'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
Parliament Winter Session: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणेच वादळी झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी जोरदार गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज शून्य प्रहरात सुरू होताच, एसआयआर आणि प्रदूषण यांसारख्या तातडीच्या आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरू केला. लोकसभा अध्यक्षांनी शांतता राखण्याचे आवाहन करूनही गदारोळ थांबला नाही, त्यामुळे अखेर कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना उद्देशून मोठे विधान केले होते. ते म्हणाले होते की, संसदेत 'ड्रामा नाही, डिलिव्हरी' झाली पाहिजे. यावर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी जोरदार प्रतिक्रिया देत पलटवार केला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सकारात्मक राजकारण करण्याचा सल्ला दिला. विरोधकांनी त्यांच्या पराभूत मानसिकतेवर मात करावी. संसद हे महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्याचे ठिकाण आहे आणि नाटकं करण्यासाठी इतरही ठिकाणे आहेत. त्यावर वायनाडमधील काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी तीव्र शब्दांत टीका केली. "निवडणुकीची परिस्थिती, एसआयआर आणि प्रदूषण हे खूप मोठे मुद्दे आहेत, त्यावर चर्चा झालीच पाहिजे. संसद कशासाठी आहे? मुद्द्यांवर बोलणे आणि ते उपस्थित करणे हा ड्रामा नाही. चर्चा होऊ न देणे, हा खरा ड्रामा आहे," अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांच्या विधानाला उत्तर दिले.
#WATCH दिल्ली: कांग्रेस सांसद प्रियंका गांधी वाड्रा ने कहा, "...चुनाव की स्थिति, SIR और प्रदूषण बहुत बड़े मुद्दे हैं। आइए उन पर चर्चा करें। संसद किस लिए है?...यह ड्रामा नहीं है। मुद्दों पर बोलना और उन्हें उठाना ड्रामा नहीं है। ड्रामा का मतलब है कि चर्चा न होने देना..." pic.twitter.com/FRBM3s7L3v
— ANI_HindiNews (@AHindinews) December 1, 2025
पंतप्रधानांचे आवाहन आणि काँग्रेसचा आक्षेप
पंतप्रधान मोदींनी सर्व पक्षांना, विशेषतः विरोधी पक्षांना अधिवेशन सुरळीत आणि सन्मानजनकपणे चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी स्पष्ट केले की, ड्रामा करण्यासाठी संसदेबाहेर अनेक जागा आहेत, पण सभागृहात गोंधळाला जागा नाही. यावर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर ढोंगीपणाकरत असल्याचा आरोप केला. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी , पंतप्रधान स्वतः कधी संसदेत उपस्थित नसतात किंवा विरोधकांशी संवाद साधत नाहीत. संसद सुरळीत न चालल्यास संपूर्ण दोष पंतप्रधानांचा आहे, कारण ते अत्यावश्यक सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास परवानगी देत नाहीत," असे म्हटले.
अधिवेशनातील प्रमुख मुद्दे आणि गदारोळाचे कारण
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात एसआयआर आणि वायू प्रदूषण या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरून झाली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव आणि काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी एसआयआर हा सर्वात मोठा मुद्दा असून, त्यावर चर्चा न झाल्यास कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून दिल्लीतील प्रदूषणाच्या लाजिरवाण्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी तात्काळ कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली आहे, कारण प्रदूषणाने लहान मुलांच्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान केले आहे.
दरम्यान, सरकार या अधिवेशनात विमा कायद्यातील सुधारणा आणि तंबाखू उत्पादनांवर कर (सेस) लावण्यासंबंधीच्या विधेयकांसह एकूण नऊ आर्थिक विधेयके सादर करणार आहे.