मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:42 IST2025-03-24T15:40:26+5:302025-03-24T15:42:08+5:30
Parliament Budget Session: मुस्लिम आरक्षण संविधानाचे उल्लंघन असल्याचा आरोप भाजपने केला, तर खरगे म्हणतात- हे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही.

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी
Congress Vs BJP: राज्यसभेत सोमवारी (24 मार्च) कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षणावरुन बराच गदारोळ झाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कर्नाटक सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृह नेते जेपी नड्डा यांनी हे आरक्षण घटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तर, याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते खरगे यांनी, आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही, असे ठणकावून सांगितले.
राज्यसभेचे कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. गरज भासल्यास राज्यघटना बदलण्यासही तयार असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले होते, असा आरोप त्यांनी केला. हे विधान एखाद्या सामान्य व्यक्तीकडून आले असते, तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असते, पण घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचे हे विधान अत्यंत चिंताजनक आहे, असेही रिजिजू म्हणाले.
#WATCH | Delhi: In Rajya Sabha, Leader of the House and BJP national president JP Nadda says, "...In Karnataka Vidhan Sabha, a proposal has been passed to give 4% reservation (to minorities) to give contracts to contractors. Sardar Patel and Ambedkar had said that reservation on… pic.twitter.com/ZUxIJLHwy2
— ANI (@ANI) March 24, 2025
संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरुन तीव्र वाद
काँग्रेसवर निशाणा साधत रिजिजू म्हणाले की, विरोधक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो गळ्यात घालून फिरतात, पण आता ते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. संविधान बदलून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची काय योजना आहे? असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या आरोपाचे खंडन करत काँग्रेसचा संविधानाशी छेडछाड करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले.
जेपी नड्डांचा पलटवार
भाजप नेते जेपी नड्डा यांनी कर्नाटक सरकारच्या मुस्लीम आरक्षणावर वक्तव्य करताना हे संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही, असे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले होते. काँग्रेस संविधान रक्षणाचा ढोल बडवते, पण आता तोच पक्ष संविधान बदलण्याची भाषा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
खर्गेंचा पलटवार
तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आरोपाचे खंडन करत भारताची राज्यघटना वाचवण्याचे काम केवळ काँग्रेसनेच केल्याचे म्हटले. राज्यघटना बदलण्याची कोणतीही शक्यता नसून या सर्व अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.