पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 23:19 IST2025-05-10T23:18:38+5:302025-05-10T23:19:36+5:30
Ceasefire Violation: युद्धविरामाला काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर आता पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
गेल्या चार दिवसांपासून सीमे लगतच्या भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघर्षानंतर आज संध्याकाळपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम लागू झाला होता. दरम्यान, या युद्धविरामाला काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर आता पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आल्यानंतर घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाईनंतर आज भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागच्या काही तासांपासून या युद्धबंदीचं घोर उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारतीय लष्कर प्रत्युत्तरदाखल कारवाई करत आहे. तसेच या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत निंदनीय आहे. तसेच पाकिस्तान यासाठी जबाबदार आहे. पाकिस्तानने या परिस्थितीचा व्यवस्थित विचार करावा आणि आगळीक थांबवावी, हे अतिक्रमण रोखण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी, असं आम्ही आवाहन करत आहोत, असे विक्रम मिस्त्री यांनी म्हटले आहे.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "An understanding was reached this evening between the DGMOs of India and Pakistan to stop the military action that was going on for the last few days. For the last few hours, this understanding is being violated by Pakistan.… pic.twitter.com/BNGnyvTnUH
— ANI (@ANI) May 10, 2025
दरम्यान, आज अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर झाला होता. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून युद्धविरामाला सुरुवात होऊन काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबारास सुरुवात केली, एवढंच नाही तर पाकिस्तानने जम्मू आणि श्रीनगर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला.