Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 17:47 IST2025-05-23T17:45:13+5:302025-05-23T17:47:22+5:30
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर गुप्तचर यंत्रणांनी आतापर्यंत १४ पाकिस्तानी गुप्तहेराना अटक केलीय. यात सर्वाधिक नाव चर्चिले गेले युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच. आता पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मद हारून याला दिल्लीत अटक करण्यात आलीये.

Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
Pakistan Spy Case: ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला अटक करण्यात आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी देशभरात झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर तब्बल १४ जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. १४वा आरोपी आहे, मोहम्मद हारून. तो दिल्लीचा असून, त्याची वेगळीच कहाणी समोर आलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणाचा तपास करताना गुप्तचर यंत्रणा १४ जणांपर्यंत पोहोचल्या आहेत. हेरगिरी प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहे. सुरूवातीला पंजाब, हरयाणापर्यंत मर्यादित असलेले हे हेरगिरी नेटवर्क उत्तर प्रदेश आणि दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दिल्लीतून एका आरोपीला अटक केली.
कोण आहे मोहम्मद हारून?
हेरगिरी प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने १४व्या आरोपीला बेड्या ठोकल्या. दिल्लीतील सीलमपूरमध्ये मोहम्मद हारूनला अटक करण्यात आली. हारून पाकिस्तानी दूतावासातील एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
भंगारचा व्यवसाय, एक पत्नी पाकिस्तानात
उत्तर प्रदेश एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दूतावासात काम करणाऱ्या मुजम्मिल हसैन यांच्या संपर्कात आल्यानंतर हारूनला पकडण्यात आले. तो दिल्लीत भंगार खरेदी-विक्रीचं काम करतो.
हारूनने दोन लग्न केली आहेत. त्यांची एक पत्नी पाकिस्तानात राहते. हारूनची आत्याही पाकिस्तानातच राहते. त्याचे दुसरे लग्न पाकिस्तानातील त्याच्या आत्याच्या मुलीसोबतच झालेले आहे.
हारूनच्या घरच्यांनी सांगितले की, त्याने दुसरे लग्न केले असल्याचे दोन वर्षापूर्वी कळले. हारून पाकिस्तान जायचा असेही घरच्यांनी सांगितले. हारून ५ एप्रिल रोजी पाकिस्तानला गेला होता. तो २० दिवस पाकिस्तानात राहिला आणि २५ एप्रिल रोजी परत आला होता. पण, यंत्रणांसमोर हा प्रश्न आहे की, पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्यांसोबत भंगार विकणाऱ्या हारूनचे संबंध कसे निर्माण झाले?