लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:24 IST2025-09-25T10:21:55+5:302025-09-25T10:24:46+5:30
Ladakh Protest: सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण, उपोषण सुरू असतानाच हिंसेचा भडका उडाला. त्यानंतर वांगचूक यांचा पाकिस्तान दौरा चर्चेत आला आहे.

लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
Ladakh Violence: केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून परिस्थिती चिघळली आहे. लेहमध्ये सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू असतानाच हिंसेचा भडका उडाला. जेन झी आंदोलकांनी भाजप कार्यालयावर हल्ला केला. पोलिसांसोबतही झटापट झाली. यात चार जणांचा मृत्यू झाला. ७० जण जखमी झाले. या हिंसेची चर्चा सुरू असतानाच वांगचूक यांनी काही महिन्यांपूर्वी केलेला पाकिस्तान दौरा चर्चेत आला आहे. त्याबद्दल शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या १५ दिवसांपासून सोनम वांगचूक अन्न पाणी न घेता उपोषण करत होते. मात्र, बुधवारी उपोषणाला हिंसक वळण लागले. लेहमध्ये आंदोलक हिंसक झाले. त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे अचानक उफाळलेल्या या हिंसाचारामागे पाकिस्तान कनेक्शन तर नाही ना? अशा शंका उपस्थित होऊ लागल्या. त्यासाठी वांगचूक यांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या पाकिस्तान दौऱ्यावर बोट ठेवले जाऊ लागले आहे.
वांगचूक यांचा पाकिस्तान दौऱ्याभोवती शंकेची वावटळ
सोनम वांगचूक या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानला गेले होते. सहा फेब्रुवारी रोजी वांगचूक इस्लामाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. ब्रेथ पाकिस्तान या पर्यावरण विषयावरील चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता. हे चर्चासत्र डॉन या पाकिस्तानातील माध्यम समूहाने केले होते.
या चर्चासत्रात सोनम वांगचूक यांनी 'ग्लेशिअर मेल्ट: अ सस्टेनेबल स्ट्रॅटजी फॉर द वॉटर टॉवर्स ऑफ साऊथ एशिया' या विषयावरील चर्चासत्रात भाग घेतला होता. या दौऱ्यात असतानाच त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुकही केलं होतं.
पाकिस्तान दौऱ्याबद्दल वांगचूक काय बोलले होते?
वांगचूक यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून मी इस्लामाबादमध्ये आहे, असे सांगितले होते. मी मिशन लाईफबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. पाणी आणि प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन यांना कोणतीही सीमा नाहीये. आपल्या प्रयत्नांनाही कोणत्याही सीमा असता कामा नये आणि चांगल्या प्रयत्नांचे कौतुक व्हायलाच हवे, असे त्यावेळी ते म्हणाले होते.
वांगचूक यांच्या या दौऱ्याबद्दल त्यावेळीच प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यावेळीच त्यांनी स्पष्ट केलं होतं की, पर्यावरणाला सीमा नसतात. यामुळे पूर्ण जगाला नुकसान होत आहे. पर्यावरणाशी संबंधित प्रयत्न सीमामध्ये बंदिस्त करता येऊ शकत नाही. मी इथे येऊन पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाचे कौतुक यासाठी केलं, कारण चांगल्या प्रयत्नांचा नेहमीच सन्मान व्हायला हवा, असेही ते म्हणाले होते.