राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 20:19 IST2025-11-26T20:15:42+5:302025-11-26T20:19:19+5:30
ज्या देशाचा कट्टरता आणि अल्पसंख्यांकांवर दडपशाही करण्याचा मोठा इतिहास आहे, त्यांना दुसऱ्यांना उपदेश देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत भारत सरकारने पाकिस्तानला फटकारले आहे.

राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
अयोध्येतील राम मंदिर ध्वजारोहण समारंभावर भाष्य करणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. यासंदर्भात भारतानेपाकिस्तानला 'उपदेश न देण्याचा' सल्ला दिला आहे. ज्या देशाचा कट्टरता आणि अल्पसंख्यांकांवर दडपशाही करण्याचा मोठा इतिहास आहे, त्यांना दुसऱ्यांना उपदेश देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत भारत सरकारने पाकिस्तानला फटकारले आहे.
पाकिस्तानला फटकारत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल बुधवारी म्हणाले, "आम्ही पाकिस्तानची टिप्पणी बेइज्जती करत फेटाळून लावतो, ज्यासाठी ते पात्र आहेत. अल्पसंख्यांकांवर कट्टरता, दडपशाही आणि त्यांना पद्धतशीरपणे वाईट वागणूक देण्याचा ज्या देशाचा डागाळलेला मोठा इतिहास आहे, त्या पाकिस्तानला इतरांना उपदेश देण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही."
जायस्वाल पुढे म्हणाले, "ढोंगी उपदेश देण्याऐवजी, पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावे आणि त्यांच्या खराब मानवाधिकार नोंदीकडे लक्ष द्यावे." तत्पूर्वी, पाकिस्तानने राम मंदिर ध्वजारोहणाला विरोध करत, हे पाऊल कथित पणे धार्मिक अल्पसंख्यकांवर वाढता दबाव आणि मुस्लीम वारसा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे, असे म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिरावर भगवा ध्वज फडकवला. याच बरोबर, मंदिर निर्मितीची औपचारिक सांगता झाली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. मोदींनी या ध्वजारोहणाला 'युगांतकारी' (युग बदलणारे) अशी संज्ञा देत, "पाचशे वर्षांचा संकल्प पूर्ण होत असल्याने शतकानुशतके झालेले घाव आणि वेदना आता भरत आहेत," असे म्हटले आहे.