शेतकरी आंदोलनात गडबड करण्याचे ना’पाक’ कारस्थान, रचले असे षडयंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 21:36 IST2021-01-24T21:33:34+5:302021-01-24T21:36:50+5:30
Farmer Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनात गडबड करण्याचे ना’पाक’ कारस्थान, रचले असे षडयंत्र
नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता दोन महिने पूर्ण होत आले आहेत. आता या कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी शेतकरी भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. मात्र यादरम्यान, शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस अलर्टवर आहेत. दरम्यान शेतकरी आंदोलनात गडबड करण्यासाठी पाकिस्तानने ट्विटरवरून कारस्थान रचल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पाकिस्तानमधून हँडल होत असलेल्या ३०८ ट्विटर अकाऊंटची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून, हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत दिल्ली पोलिसांचे स्पेशल कमिश्नर दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीमध्ये गडबड करण्यासाठी कारस्थान रचले जात असल्याची माहिती आम्हाला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ३०८ ट्विटर अकाऊंट्स उघडण्यात आली आहेत. त्यामाध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, ट्रॅक्टर रॅलीबाबत दिल्लीच्या स्पेशल कमिश्नरांनी सांगितले की, आज शेतकऱ्यांसोबत झालेला संवाद चांगला झाला. दिल्लीतील तीन ठिकाणांहून ट्रॅक्टर रॅली काढण्याची परवानगी दिली आहे. या तिन्ही सीमांवरून बॅरिकेड्स हटवण्यात येतील. या बॅरिकेड्स हटवून आंदोलकांना काही किलोमीटर आत येऊ दिले जाईल, असेही पाठक यांनी सांगितले.