पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:40 IST2025-07-14T13:39:47+5:302025-07-14T13:40:19+5:30
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.

पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
Pahalgam Terror Attack: मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून पाच वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त एका मुलाखतीत त्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल उघडपणे भाष्य केले. सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी घेतली असून, ही एक मोठी सुरक्षा चूक असल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाही तर भारताच्या आत्म्यावर हल्ला केला आहे.
हा देशाच्या आत्म्यावर हल्ला
मनोज सिन्हा पुढे म्हणाले की, मी या घटनेची संपूर्ण जबाबदारी घेतो, कारण ती सुरक्षेची मोठी चूक होती. ज्या ठिकाणी हल्ला झाला, ते एक मोकळे मैदान होते. त्यामुळेच, तिथे सुरक्षा दलांसाठी कोणतीही सुविधा किंवा जागा करण्यात आली नव्हती. पाकिस्तानने फक्त पर्यटकांवरच नाही, तर देशाच्या आत्म्यावर हल्ला केला. परंतु भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला स्पष्टपणे इशारा दिला की, भारत आता कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला सहन करणार नाही.
राज्याच्या अर्थव्यवस्था वाढली
पर्यटकांच्या जास्तीत जास्त येण्याने राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. येथील अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा दुप्पट झाली आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्याचा एक मुख्य उद्देश राज्याच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धक्का देणे हा होता. या हल्ल्याचा आणखी एक उद्देश देशाच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांना जम्मू-काश्मीरविरुद्ध भडकवणे आणि देशभरात जातीय फूट पाडणे हा होता. पाकिस्तानला जम्मू-काश्मीरची भरभराट होऊ द्यायची नाही, असेही त्यांनी म्हटले.
स्थानिकांचा सहभाग होता का?
मनोज सिन्हा म्हणाले की, एनआयएने या हल्ल्यात अनेक स्थानिक लोकांचा सहभाग असल्याचे उघड केले आहे. काही लोकांच्या सहभागाचा अर्थ असा नाही की, संपूर्ण राज्य वाईट आहे आणि येथील सुरक्षा वातावरण प्रदूषित झाले आहे. परिस्थिती बरीच सुधारली आहे. यावेळी एका व्यक्तीचा सहभाग आढळून आला आहे. गेल्या वर्षी ही संख्या ६-७ होती आणि एकेकाळी ती १०० पेक्षा जास्त होती. हेदेखील खरे आहे की, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर राज्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसवले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आता दहशतवादी हल्ले सहन करणार नाही
भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानसाठी लाल रेषा आखली आहे. आमच्या सैन्याने त्यांच्या घरात घुसून त्यांचा एअरबेस उद्ध्वस्त केला आणि पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला की, आम्ही आता कोणताही दहशतवादी हल्ला स्वीकारणार नाही. पाकिस्तान हा असा देश आहे, ज्यावर कधीही विश्वास ठेवता येणार नाही. गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि आमच्या गुप्तचर संस्था पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवून आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
He finally takes responsibility of ‘Pahalgam’ after 82 days of the attack. In doing so, who is he protecting in Delhi?
How many days, weeks, months to also be held accountable and resign or get sacked? pic.twitter.com/1NF60nH1Jd— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) July 14, 2025
काँग्रेसचा सरकारवर निशाणा
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मनोज सिन्हा यांच्या विधानावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. खेडा म्हणाले की, हल्ल्याच्या ८२ दिवसांनंतर त्यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली. असे करून ते दिल्लीत कोणाचे रक्षण करत आहेत? त्यांना जबाबदार धरण्यासाठी किती दिवस, आठवडे, महिने लागतील? ही जबाबदारी घेतल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागेल की बडतर्फ करावे लागेल? असा खोचक सवाल त्यांनी केला.