एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:34 IST2025-04-26T05:33:50+5:302025-04-26T05:34:21+5:30
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना सोडावा लागणार भारत, २७ एप्रिलपासून सर्व व्हिसा रद्द

एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून दिली.
पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली होती. तसेच पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर मायदेशी परतावे असेही सांगितले. पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश बुधवारी देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले असले, तरी हा निर्णय पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना लागू होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले.
पाकिस्तानी हिंदू येतात धार्मिक विधींसाठी भारतात
पाकिस्तानातील हिंदू नागरिक आपल्या नातेवाइकांच्या अस्थिविसर्जन व धार्मिक विधींसाठी भारतातील हरिद्वार, ऋषिकेश यांसारख्या तीर्थस्थळांना भेट देतात. अनेक अडथळे असूनही दोन्ही बाजूंनी नातेसंबंध जपले जातात. विवाहसंबंधही जुळवले जातात. स्थानिक रहिवाशांच्या मते, केंद्र सरकारच्या आदेशामुळे अनेक विवाहांवर संकट निर्माण झाले आहे.
हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे : अमेरिका
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी शुक्रवारी सांगितले की, पहलगामध्ये अमानूष हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिका भारताला सहकार्य करेल. याआधी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
भारत सोडण्याच्या आदेशाने धार्मिक यात्रेवर आलेल्यांची वाढली चिंता
४८ तासांत भारत सोडण्याच्या आदेशामुळे धार्मिक यात्रेसाठी आलेल्या पाक हिंदू नागरिकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. आहे. त्यांना इतक्या तातडीने परत कसे जावे हेच समजेनासे झाले आहे. भारत सरकारने वाघा आणि अटारी सीमाचौक्या बंद केल्या आहेत. २७ मार्च रोजी ईश्वरदास हे आपल्या कुटुंबातील १३ सदस्यांसह वाघा सीमेमार्गे जोधपूरला आले. त्यांच्या ग्रुपमध्ये एकूण ५० लोक आहेत. त्यांच्या व्हिसाची मुदत २५ मे रोजी संपणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तेही गोंधळले आहेत.