"पंतप्रधान मोदी देश विकून जातील आणि आपण..."; श्रीमंत मित्रांचा उल्लेख करत खरगेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:02 IST2025-04-09T12:59:05+5:302025-04-09T13:02:01+5:30

गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Opposition voice is being suppressed for 11 years Mallikarjun Kharge targets Modi government in the Congress AICC Session | "पंतप्रधान मोदी देश विकून जातील आणि आपण..."; श्रीमंत मित्रांचा उल्लेख करत खरगेंचे टीकास्त्र

"पंतप्रधान मोदी देश विकून जातील आणि आपण..."; श्रीमंत मित्रांचा उल्लेख करत खरगेंचे टीकास्त्र

Congress AICC Session 2025: गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार पूर्ण देशाला विकून निघून जाणार असल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. त्यांच्या सरकारने  खाणकामापासून विमानतळांपर्यंत सर्व काही उद्योगपती मित्रांच्या हाती सोपवले असल्याचेही खरगे म्हणाले. यावेळी त्यांनी ईव्हीएमचाही मुद्दा उपस्थित केला.

गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन होत आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनात मंगळवारी पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची चार तास बैठक चालली. आज साबरमती रिव्हरफ्रंट येथे होत असलेल्या मुख्य अधिवेशनात देशभरातील १७०० हून अधिक काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहभागी झालेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल अधिवेशनात उपस्थित आहेत. भाषणात मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

"जर परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस येईल जेव्हा मोदी सरकार आणि स्वतः मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील. मी हे स्पष्टपणे सांगत आहे. विमानतळ असो, खाणकाम असो, मीडिया हाऊस असो किंवा टेलिकॉम असो, हे सरकार ते आपल्या उद्योगपती मित्रांना देत आहे. यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे," असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"सरकारने असे तंत्रज्ञान विकसित केले की ज्याचा त्यांना फायदा देईल आणि विरोधकांना नुकसान. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात. महाराष्ट्राच्या निवडणुकाही फसवणूक करुन जिंकल्या गेल्या. महाराष्ट्रात १५० जागा लढल्या गेल्या आणि १३८ जागा जिंकल्या गेल्या, म्हणजेच ९० टक्के विजय. हे आधी कधीही पाहिले नव्हते. चोर चोरी करतो. पण आज नाही तर उद्या पकडला जाईल म्हणून सर्व काही उघडकीस येईल," असेही खरगे म्हणाले.

"११ वर्षांत, विरोध करणाऱ्या राज्यांना सावत्र वागणूक देण्यात आली. केंद्र-राज्य संबंध इतके चांगले होते की कोणीही कधीही येऊन काहीही मागू शकत होते. पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये जे काही बजेटमध्ये जाहीर ते कधीच देत नाहीत. आमचे मुख्यमंत्री नरेगासाठी निधीची मागणी करत आहेत, पण मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही कारण त्यांचे मित्र श्रीमंत आहेत, जो श्रीमंतांचा मित्र आहे तो गरिबांचा मित्र होऊ शकत नाही," अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

Web Title: Opposition voice is being suppressed for 11 years Mallikarjun Kharge targets Modi government in the Congress AICC Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.