Operation Sindoor: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत महत्वाची माहिती दिली. पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ही कारवाई केली. गृहमंत्र्यांनी या संपूर्ण कारवाईची सविस्तर माहिती सभागृहात दिली.
पहलगामचे हल्लेखोर ठार झालेऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शहा म्हणाले की, "पहलगाममध्ये धर्म विचारुन निष्पाप पर्यटकांची क्रूर हत्या करण्यात आली, मी याचा तीव्र निषेध करतो आणि मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अथवा ठार करण्यासाठी सुरक्षा दलांनी २२ मे 'ऑपरेशन महादेव' सुरू केले होते. या कारवाईत पहलगाममधील तिन्ही दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन स्थानिकांनाही पकडण्यात आले आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी शस्त्रे जप्त गृहमंत्री पुढे म्हणाले, "२२ मे रोजी आयबीला दाचीगाम परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. या माहितीची पुष्टी करण्यासाठी मे ते २२ जुलै पर्यंत सतत प्रयत्न केले गेले. २२ जुलै रोजी सेन्सर्सद्वारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी झाली. त्यानंतर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. सुलेमान, जिब्रान आणि अफझल असे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्याने ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडून तीन रायफल जप्त करण्यात आल्या. पहलगाममध्ये ज्या रायफल्सने हल्ला करण्यात आला होता, त्याच रायफल या आहेत."
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
चिदंबरम यांच्या वक्तव्यावरुन शाह संतापले"काल ते (काँग्रेस) आम्हाला विचारत होते की, दहशतवादी कुठून आले आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे? अर्थात, ही आमची जबाबदारी आहे, कारण आम्ही सरकारमध्ये आहोत. काल या देशाचे माजी गृहमंत्री चिदंबरमजी यांनी हा प्रश्न उपस्थित केला की, हे दहशतवादी पाकिस्तानातून आले आहेत याचा पुरावा काय आहे? ते काय म्हणू इच्छितात? ते कोणाला वाचवू इच्छितात? पाकिस्तानला वाचवून तुम्हाला काय मिळेल? पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच मी पीडित कुटुंबांना भेटलो होतो. मी माझ्या समोर एक महिला उभी असल्याचे पाहिले, जी तिच्या लग्नाच्या फक्त ६ दिवसांनी विधवा झाली होती - मी ते दृश्य कधीही विसरू शकत नाही. मी आज सर्व पीडित कुटुंबांना सांगू इच्छितो की, मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना त्या दहशतवाद्यांना ठार केले आहे," असे शाहांनी यावेळी स्पष्ट केले.