"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:17 IST2025-05-20T15:16:22+5:302025-05-20T15:17:03+5:30
Operation Sindoor: त्यांचे नेते मोरारजी देसाई हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याशिवाय लालकृष्ण अडवाणींसारखे आणखी काही नेते निशान ए पाकिस्तानचे हक्कदार आहेत. तसेच नवाज शरीफ यांच्या घरी न बोलावता बिर्याणी खायला गेलेली व्यक्तीही या पुरस्कारासाठी पात्र आहे, अशी टीका पवन खेरा यांनी केली.

"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला
पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत त्याचा घेतलेला बदला आणि चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम, यानंतर आता भारताच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर गंभीर आरोप करत या संघर्षात भारताने किती राफेल विमानं गमावली आसा, सवाल केला होता. त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याला आता काँग्रेसकडूनही तिखट प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
अमित मालवीय यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, गंभीर वातावरणामध्ये सत्ताधारी पक्षाकडून कार्टुनगिरी सुरू आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत उभे होते. मात्र भाजपा नेहमी वाह्यातपणा करते. आमचा सैन्यदलांवर विश्वास आहे, मात्र आमचा राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास नाही. पहलगाममध्ये निष्पाप लोकांची हत्या करून फरार झालेल्या चार दहशतवाद्यांचे काय झाले? खरंतर नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाऊन आलेल्यांना निशान-ए-पाकिस्तान मिळाला पाहिजे, अशा टोलाही त्यांनी लगावला.
पवन खेरा पुढे म्हणाले की, आम्ही देशाच्या राजकीय नेतृत्वाला विचारू इच्छितो की, तुम्ही पाकिस्तानला आधीच कल्पना दिली होती, त्यामुळेच अझहर मसूद आणि हाफिज सईद बचावले का? आता निशान ए पाकिस्तानचा प्रश्न विचाराल तर, त्यांचे नेते मोरारजी देसाई हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याशिवाय लालकृष्ण अडवाणींसारखे आणखी काही नेते निशान ए पाकिस्तानचे हक्कदार आहेत. तसेच नवाज शरीफ यांच्या घरी न बोलावता बिर्याणी खायला गेलेली व्यक्तीही या पुरस्कारासाठी पात्र आहे, अशी टीका पवन खेरा यांनी केली.