Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:24 IST2025-05-07T07:22:33+5:302025-05-07T07:24:15+5:30
India Air Strike On Pakistan: ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे २०२५ रोजी सुरू केलेली एक ऐतिहासिक लष्करी कारवाई आहे, ज्यात विशेष दारुगोळ्याचा वापर करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
Operation Sindoor: काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर त्यावर योग्य ते उत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. कोणी कल्पनाही केली नसेल असं उत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे २०२५ रोजी सुरू केलेली एक ऐतिहासिक लष्करी कारवाई आहे, ज्यात विशेष दारुगोळ्याचा वापर करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त
काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.
पहलगाममधील बैसरन भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाची प्रॉक्सी संघटना रेझिस्टन्स फ्रंटनं (TRF) स्वीकारली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या हल्ल्याचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सशी (आयएसआय) जोडला होता. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबिया दौरा रद्द करत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. यानंतर आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विशेष दारुगोळ्याचा वापर करून दहशतवाद्यांची ठिकाणं नष्ट करण्यात आली.
विशेष दारुगोळा
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अत्याधुनिक आणि अचूक दारुगोळा वापरला, ज्यामुळे कमीत कमी नागरी नुकसानीसह जास्तीत जास्त परिणाम सुनिश्चित होतो. स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र आणि भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी सुसज्ज हॅमर क्षेपणास्त्र या दोन शक्तिशाली शस्त्रप्रणाली ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमांमध्ये वापरल्या गेल्या.
स्कॅल्प क्रूज मिसाइल (SCALP-EG / Storm Shadow)
स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र, ज्याला यूकेमध्ये स्टॉर्म शॅडो म्हणून ओळखले जाते. हे फ्रेंच-ब्रिटीश लांब पल्ल्याचे, हवेतून जमिनीवर मारा करू शकणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. युरोपियन डिफेन्स कंपनी एमबीडीएनं याची निर्मिती केली आहे. भारताच्या ३६ राफेल विमानांचा हा भाग आहे. त्याचं पूर्ण नाव Système de Croisière Autonome à Longue Portée – Emploi Général आहे, ज्याचा अर्थ "लांब पल्ल्याच्या स्वायत्त क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली - सामान्य वापर" असा आहे.
हॅमर मिसाईल (HAMMER - Highly Agile Modular Munition Extended Range)
हॅमर मिसाईल, ज्याला AASM (Armement Air-Sol Modulaire) असंही म्हटलं जातं, ही फ्रेंच संरक्षण कंपनी सफ्राननं विकसित केलेली मध्यम पल्ल्याची, अचूक-निर्देशित हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्रप्रणाली आहे. हे एक मॉड्युलर शस्त्र आहे जे प्रोपल्शन किट आणि मार्गदर्शन प्रणालीसह सामान्य बॉम्बेचं प्रगत क्षेपणास्त्रांमध्ये रूपांतर करते. राफेल विमानांच्या आपत्कालीन खरेदीअंतर्गत भारतानं हे खरेदी केले आहे, विशेषत: २०२० मध्ये चीनसोबत सीमेवरील तणावादरम्यान याची खरेदी करण्यात आली होती.
राफेल
भारतीय हवाई दलाची चार राफेल लढाऊ विमानं रात्रभर काश्मीर भागात नियंत्रण रेषेवर गस्त घालताना दिसल्याचा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी नुकताच केला होता. पीटीव्ही न्यूज आणि रेडिओ पाकिस्ताननं सुरक्षा सूत्रांच्या हवाल्यानं पाकिस्तानी हवाई दलानं या विमानांचा पाठलाग केला आणि त्यानंतर ते परतल्याचं म्हटलं होतं. मात्र, भारतानं हे दावे खोटे आणि काल्पनिक असल्याचं म्हटलं होतं.
राफेल हे ४.५ जनरेशनचे मल्टी रोल फायटर जेट आहे, जे आपल्या प्रगत तंत्रज्ञान आणि मारक शक्तीसाठी ओळखलं जातं.