पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:42 IST2025-05-07T13:42:07+5:302025-05-07T13:42:38+5:30
गृहमंत्री अमित शाहांनी सर्व अधिकाऱ्यांना देशातील अंतर्गत सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
Operation Sindoor: पाकिस्तान समर्थिक दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकिस्तानात 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यात सूमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी बुधवारी (7 मे, 2025) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना आश्रय देण्यासाठी बंकर तयार ठेवण्यासही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. तसेच, सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे निर्देशही दिले आहेत. गृहमंत्र्यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला असून, सर्व उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि कडक नजर ठेवण्यासही सांगितले आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत गृहमंत्र्यांचे निर्देश
गृहमंत्र्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' हे पहलगाममधील निष्पाप लोकांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेला प्रतिसाद असल्याचे वर्णन केले. त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारत आणि देशातील नागरिकांवरील कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आणि दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
ऑपरेशन सिंदूरनंतर काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (7 मे) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. याशिवाय ते सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठकही घेणार आहेत. यात सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.