अल्पवयीन मुलींशी लग्न करणारे रडारवर, आसामातील हजारो पतींना अटक होणार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 07:14 IST2023-01-29T07:13:33+5:302023-01-29T07:14:03+5:30
Assam News: येत्या पाच - सहा महिन्यांत राज्यातील हजारो पतींना अटक होईल. कारण, पोक्सोअंतर्गत १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे.

अल्पवयीन मुलींशी लग्न करणारे रडारवर, आसामातील हजारो पतींना अटक होणार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांचा इशारा
गुवाहाटी : येत्या पाच - सहा महिन्यांत राज्यातील हजारो पतींना अटक होईल. कारण, पोक्सोअंतर्गत १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. मग संबंध ठेवणारा मुलीचा कायदेशीर पती असला तरीही! असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा एका सरकारी कार्यक्रमात म्हणाले. मुलीच्या विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे असून, कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. ‘अनेकांना (अल्पवयीन मुलींशी लग्न करणाऱ्यांना) जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते,’ असेही ते म्हणाले.
अल्पवयीन मातृत्त्वाला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर कायदे आणण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली. बालविवाह आणि अल्पवयीन मातृत्त्वाला आळा घालण्याप्रतिच्या आपल्या सरकारच्या बांधिलकीचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. (वृत्तसंस्था)
योग्य वयात लग्नही करा
मातृत्त्वाविषयी बोलताना सरमा म्हणाले, “आम्ही अल्पवयीन मातृत्त्वाच्या विरोधात बोलत आहोत. परंतु, त्याचवेळी स्त्रियांनी आई होण्यासाठी जास्त वेळ थांबू नये. कारण, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. देवाने आपले शरीर अशा प्रकारे तयार केले आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वय आहे. मातृत्त्वासाठी योग्य वय २२ ते ३० वर्षे आहे. ज्या महिलांनी अद्याप लग्न केलेले नाही, त्यांनी लवकर करावे, असेही ते हसत हसत म्हणाले.