प्रेमप्रकरणातून घडणारे गुन्हे हे गेल्या काही दिवसांमध्ये चिंतनीय पद्धतीने वाढत आहेत. दरम्यान, एका माथेफिरू प्रियकराने शाळेत असल्यापासून प्रेम असलेल्या प्रेयसीला गेस्ट हाऊसमध्ये बोलावून चाकूने सपासप वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रियकर अभय याने त्याची प्रेयसी प्रिया हिला भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं होतं. त्यानंतर या दोघांनीही शरीर संबंध प्रस्थापित केले. मात्र शेवटी अभय याने प्रियावर चाकूने सपासप १५ वार करून तिची हत्या केली.
गेस्ट हाऊसमध्ये आल्यानंतर दोघांमध्ये अचानक भांडण होऊन ही हत्या झालेलाी नाही, तर आरोपी अभय हा प्रिया हिची हत्या करण्याचे नियोजनच करून तिथे पोहोचला होता, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच कुणालाही संशय येऊ नये म्हणून अभय हा प्रिया हिला जाणीवपूर्वक गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेला होता. दरम्यान, अभय आणि प्रिया हे बरहमपूरमधील लांजीपाली परिसरातील रहिवासी होते. दोघांमध्ये शाळेत असल्यापासून मैत्री होती. तसेच तेव्हापासूनच त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र काळाच्या ओघात त्यांच्यातील नात्यामध्ये काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाला.
अभय हा एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली होती. त्यानंतर प्रियाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. ती त्याला आधीसारखं महत्त्व देत नव्हती. तसेच त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत होती. अभयने फोन केल्यावर तो उचलून उत्तर देत नव्हती. त्यामुळे या दोघांमधील भांडण वाढत गेलं. तसेच अभय दुखावला गेला.
याचदरम्यान, प्रिया हिला विवाहासाठी अनेक मुलांची स्थळं येत असल्याचे अभयला समजले. ही बाब त्याला सहन झाली नाही. प्रिया आपल्याला सोडून कुण्या दुसऱ्याची पत्नी होईल, असे त्याला वाटू लागले. त्यामधूनच त्याने प्रिया हिला संपवण्याचा निर्णय घेतला. तसेच संधी साधून प्रिया हिला गेस्ट हाऊसमध्ये बोलावले. तिथे तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवून झाल्यानंतर तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिला संपवले.