“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:10 IST2026-01-11T12:09:39+5:302026-01-11T12:10:05+5:30
NSA Ajit Doval News: देशाच्या विकासामध्ये नेतृत्वाची भूमिकाही अतिशय महत्त्वाची असते, असे अजित डोवाल यांनी नमूद केले.

“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
NSA Ajit Doval News: हल्ले, गुलामगिरीच्या वेदनादायक इतिहासाचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताला केवळ सीमांवरच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या तसेच प्रत्येक पातळीवर स्वतःला सामर्थ्यशाली करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी केले. दिल्लीमध्ये आयोजित एका समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले.
महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग आदी महनीय व्यक्तींनी स्वातंत्र्यचळवळीत दिलेल्या योगदानाचा डोवाल यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. प्रतिशोध हा काही फार चांगला शब्द नाही. पण, आपल्या देशावर झालेले हल्ले, गुलामगिरी अशा इतिहासातील वेदनादायी घटनांचा प्रतिशोध घेऊन भारताला पुन्हा महान बनवायचे आहे. केवळ सीमासुरक्षेच्या दृष्टीनेच नव्हेतर, अर्थव्यवस्था, सामाजिक विकास अशा प्रत्येक बाबतीत देशाची प्रगती साधायची आहे, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला देशभरातून ३ हजार युवकांनी उपस्थिती लावली.
सुरक्षेच्या चिंतेतूनच संघर्षाचा जन्म होतो
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, प्रत्येक संघर्ष हा सुरक्षेच्या चिंतेतूनच जन्म घेतो. संघर्ष का होतात ? लोक विकृत मनोवृत्तीचे आहेत किंवा मृतदेहांची रास पाहण्यात त्यांना आनंद मिळतो म्हणून नाही, तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी व शत्रू राष्ट्राला आपल्या अटी मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी संघर्ष होतात. सध्याची स्थिती पाहिली तरी या गोष्टी लक्षात येतील. आपण अन्य संस्कृतींवर किंवा प्रार्थनास्थळांवर हल्ले केले नाहीत. पण, सुरक्षेबाबत जागरूक नसल्यामुळे इतिहासाने आपल्याला शिकविलेला धडा नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. या गोष्टी जर तरुण पिढी विसरली तर ते देशासाठी दुर्दैवी ठरेल.
देशाच्या विकासामध्ये नेतृत्वाची भूमिकाही अतिशय महत्त्वाची
देशाच्या विकासामध्ये नेतृत्वाची भूमिकाही अतिशय महत्त्वाची असते. तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही स्वतंत्र भारतात जन्माला आलात. मी स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आलो. आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यासाठी ते अनेक परीक्षा आणि संकटांना सामोरे गेले, असे सांगत डोवाल यांनी उपस्थित तरुणांना स्वतःच्या अनुभवातून शिकण्याचा, ठामपणे निर्णय घेण्याचा आणि एकदा निर्णय घेतल्यावर त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, बदला हा चांगला शब्द नाही. पण त्यामुळे प्रचंड बळ मिळू शकते. आपल्याला आपल्या इतिहासाचा बदला घ्यावा लागेल आणि या देशाला अशा ठिकाणी न्यावे लागेल, जिथे आपण केवळ सीमा सुरक्षेच्या बाबतीतच नव्हे तर अर्थशास्त्र, सामाजिक विकास, अशा प्रत्येक बाबतीत पुन्हा महान होऊ. स्वप्नांनी आयुष्य घडत नाही, तर ते केवळ दिशा म्हणून काम करतात, तसेच ही स्वप्ने एका दिवसात पूर्ण होणार नाहीत, असेही ते म्हणाले.