Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:48 IST2018-07-31T15:42:54+5:302018-07-31T15:48:29+5:30
Assam NRC Final Draft :केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाध्यक्षांना तोंडावर पाडलं

Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी
नवी दिल्ली: आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन राजकारण प्रचंड तापलं आहे. आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अमित शहांनी या मुद्यावरुन काँग्रेस लक्ष्य केलं. काँग्रेस आसाम करार लागू करण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र आम्ही या कराराची अंमलबजावणी करण्याचं धाडस दाखवलं, असं म्हणत शहांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं होतं. मात्र भाजपा वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचं म्हटलं आहे.
अमित शहांनी आज राज्यसभेत बोलताना 1985 मधील आसाम कराराचा संदर्भ दिला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार केला. मात्र काँग्रेस पक्ष या कराराची अंमलबजावणी करण्याची हिंमत दाखवू शकला नाही, असं शहा म्हणाले. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपाला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसला शहांनी लक्ष्य केलं. 40 लाख घुसखोरांना कोण वाचवू पाहतंय, असा प्रश्न शहांनी उपस्थित केला. यानंतर राज्यसभेत काँग्रेस खासदारांनी गोंधळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं.
अमित शहा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सच्या मुद्यावरुन स्वत:च्या सरकारची पाठ थोपटून घेत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं विधान अगदी उलट आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचं सिंह म्हणाले. 'एनसीआर लागू करण्यामागे सरकारचा कोणताही हात नाही. जे काही सुरू आहे, ते सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली सुरू आहे. त्यामुळे सरकारवरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,' असं राजनाथ सिंह लोकसभेत म्हणाले.