आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 08:30 IST2025-11-27T08:30:30+5:302025-11-27T08:30:49+5:30
Haryana Crime News: बनावट पोलीस अधिकारी बनून सर्वसामान्यांना गंडा घातल्याच्या तसेच व्हिडीओ कॉलमध्ये अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्ट करून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता या बदमाशांनी चक्क पोलिस अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...
बनावट पोलीस अधिकारी बनून सर्वसामान्यांना गंडा घातल्याच्या तसेच व्हिडीओ कॉलमध्ये अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्ट करून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता या बदमाशांनी चक्क पोलिस अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट व्हिजिलेन्स अधिकारी बनून ट्रॅफिक पोलिसांकडून पैशांची वसुली करत होते.
या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपींची ओळख दीपक आणि नितीन कुमार अशी पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनीही अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले होते. दरम्यान, तक्रार मिळताच तत्काळ कारवाई करून त्यांना सेक्टर-४० मधून अटक केली.
मेफिल्ड गार्डन ट्रॅफिक सिग्नलवर तैनात असलेल्या ट्रॅफिक झोनल अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. ‘१५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दोन आरोपी कारमधून आले. त्यांनी आपण व्हिजिलेन्स अधिकारी असल्याचे सांगितले आणि आम्हाला सोबत घेऊन गेले. जवळच्या पोलिस चौकीत गेल्यानंतर तुमच्याविरोधात तक्रारी आल्या आहेत, अशी बतावणी त्यांनी केली’, असे या अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या झोनल ट्रॅफिक अधिकाऱ्याने तक्रारींचं विवरण मागितलं तेव्हा आरोपींनी नंतर व्हॉट्सअॅप कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर रात्री आरोपींनी या अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअॅपवर धमकी देणारा व्हिडीओ पाठवला आणि पैशांची मागणी केली. मात्र सदर झोनल अधिकाऱ्याने त्यांची मागणी फेटाळून लावली, तसेच त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तांत्रिक सर्व्हिलान्स आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर मंगळवारी दोघांनाही अटक केली.