विमान कंपन्यांनी 'श्रद्धेचे मोल' आकाशाला टेकवले; प्रयागराजचे विमान भाडे विदेशापेक्षाही जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 22:12 IST2025-02-13T22:08:31+5:302025-02-13T22:12:35+5:30
तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे भरलेला महाकुंभ देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय ठरला आहे. प्रत्येक जण पवित्र गंगेत स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत आहे...

विमान कंपन्यांनी 'श्रद्धेचे मोल' आकाशाला टेकवले; प्रयागराजचे विमान भाडे विदेशापेक्षाही जास्त
नरेश डोंगरे -
नागपूर : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविकांची श्रद्धा ओसंडून वाहत असल्याचे बघून व्यापारी डोक्यांच्या व्यक्तींनी श्रद्धेचे मोल फिक्स केले आहे. पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी भाविकांनी खिसा रिकामा करण्याची तयारी दाखविल्याचे बघून विमान कंपन्यांनी 'श्रद्धेचे मोल' आकाशाला टेकवले आहे. परिणामी प्रयागराजचेविमान प्रवासभाडे दुबई, रोम, लंडनपेक्षाही जास्त झाले आहे.
तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे भरलेला महाकुंभ देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय ठरला आहे. प्रत्येक जण पवित्र गंगेत स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी शक्य असेल त्या वाहनाने प्रयागराज गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वाधिक भाविक रेल्वेने प्रवास करीत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नाही. ते पाहून लाखो भाविक खासगी वाहनाने प्रयागराजकडे धाव घेत आहे. वाहनांची रोज प्रचंड गर्दी होत असल्याने प्रयागराजला जोडणाऱ्या रस्त्यांवर 'महा जाम'ची स्थिती निर्माण झाली आहे. वाहने मुंग्यासारखी सरकताना पाहून अनेक भाविक हवाई मार्गे प्रयागराज गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विमानात प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी चांगलीच वाढली आहे. ते बघून त्यांनी आपल्या प्रवास भाड्यांमध्ये तिप्पट चाैपट वाढ केली आहे.
देशांतर्गत विमान प्रवासाचे (घरगुती उड्डाणे) भाडे विदेशी प्रवासापेक्षा २५ ते ५० टक्क्यांपर्यंत (अंतर पाहून) कमी असते. मात्र, प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने विमान कंपन्यांनी ही मर्यादा ओलांडून घरगुती उड्डाणाचे भाडे विदेशापेक्षाही जास्त केले आहे. सहा ते सात हजारांचे भाडे २२ ते ३३ हजारांवर नेऊन ठेवले आहे. श्रद्धेपुढे पैशाला किंमत नसल्याची भावना असल्याने अनेक भाविक या प्रचंड भाववाढीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांचे चांगलेच फावले आहे.
((१))
विमानाचे शुक्रवार १४ फेब्रुवारीचे दर
नागपूर - प्रयागराज - २१,९००पुणे - प्रयागराज - ३३,५००
मुंबई - प्रयागराज - २८,५००
औरंगाबाद - प्रयागराज - ३१,२००
दिल्ली - प्रयागराज - १४,५००
((२))
शनिवार १५ फेब्रुवारीचे दर
नागपूर - प्रयागराज - २०,५००
पुणे - प्रयागराज - २५,०००
मुंबई - प्रयागराज - ३३,०००
औरंगाबाद - प्रयागराज ४१,१००
दिल्ली - प्रयागराज - १३,६००
((३))
विदेश वारीचे दर
नागपूर - लंडन - २८, २००
नागपूर - दुबई - ११,८८३
नागपूर - हाँगकाँग -१५६९३
नागपूर - बाली - -२०,१७७
नागपूर - रोम २६,४६८
नागपूर - मास्को - ५४,५७४
नागपूर - बँकाँक -११४५२