‘एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नाही, जागावाटप सूत्रावर नाराजी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:08 IST2025-10-16T08:07:08+5:302025-10-16T08:08:48+5:30
रालोमोचे प्रमुख उपेंद्र कुशवाह नाराज, अमित शाह यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले

‘एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नाही, जागावाटप सूत्रावर नाराजी’
- एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या जागावाटप सूत्रावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय लोक मोर्चा (रालोमो) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी म्हटले आहे की, एनडीएमध्ये काहीही आलबेल नाही. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले आहे.
एनडीएमधील पक्षाच्या भविष्यातील भूमिकेवर चर्चा करण्यासाठी रालोमो प्रमुखांनी बुधवारी दुपारी पाटणा येथील पक्ष कार्यालयात आपत्कालीन बैठकीची घोषणा केली होती. ही बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली.
कुशवाह यांनी एक्सवर लिहिले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जावे लागत आहे. त्यामुळे, आज पाटणा येथील कॅम्प ऑफिसमध्ये पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत होणारी बैठक तात्काळ पुढे ढकलण्यात आली आहे.
रालोमोने एनडीएकडे २४ जागा मागितल्या होत्या आणि त्यांना किमान दुहेरी आकडी जागा जिंकण्याची आशा होती. कुशवाह यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यांनी म्हटले आहे की, घोषित जागांची संख्या अपेक्षांची पूर्तता करीत नाही, परंतु कार्यकर्त्यांनी धीर धरावा. या पोस्टमुळे असंतोषाची चर्चा सुरू झाली. कुशवाह यांना अतिरिक्त जागा किंवा राजकीय पद दिले जाण्याची शक्यता आहे.
मी लढणार नाही, प्रशांत किशोर यांची घोषणा
जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बुधवारी एक मोठी राजकीय घोषणा केली, ज्यात त्यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षाच्या हितासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी असेही म्हटले की, जर जनसुराज पक्ष १५० पेक्षा कमी जागा जिंकला तर तो पराभव मानला जाईल. आमचा पक्ष बिहार निवडणुकीत जिंकला तर त्याचे राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम होतील.
त्यांच्या या निर्णयावर भाजप व राजदने टीका केली आहे. स्थिती आपल्या बाजूने नाही, हे कळाल्यानेच हा निर्णय घेतल्याचे भाजपने म्हटले आहे.
जद(यु)कडून ५७ उमेदवारांना तिकिटे
पाटणा : जनता दल (युनायटेड) ने बुधवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनुभव आणि सामाजिक यांचे संतुलन राखत अनेक विद्यमान मंत्री, वरिष्ठ नेते आणि प्रमुख व्यक्तींवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या यादीत विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, मदन साहनी, रत्नेश सदा आणि महेश्वर हजारी यांचा समावेश आहे. पक्षाने या सर्व विद्यमान मंत्र्यांवर विश्वास कायम ठेवला आहे. यात प्रमुख माजी मंत्री श्याम रजक आणि बलाढ्य नेते अनंत कुमार सिंह आहेत.