मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 17:32 IST2026-01-08T17:31:34+5:302026-01-08T17:32:15+5:30
अमेठी जिल्ह्यातील जगदशपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेश पासी यांचा हा व्हिडिओ आहे.

मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
लखनौ - उत्तर प्रदेशात मुस्लिमांबाबत भाजपा आमदाराने केलेल्या विधानामुळे राजकीय खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर भाजपा आमदाराचे हे विधान खूप व्हायरल होत आहे. भाजपा आमदार सुरेश पासी यांनी मला मुस्लिम मतांची गरज नाही. ना मी त्यांच्या घरी जातो आणि ना जाणार आहे असं त्यांनी म्हटलं. या विधानानंतर विरोधकांनी भारतीय जनता पार्टीवर टीका सुरू केली. एका पूलाच्या उद्घाटनावेळी सुरेश पासी यांनी केलेले विधान चांगलेच गाजले. काही पत्रकारांनी मुस्लिम मतांबाबत प्रश्न विचारला भाजपा आमदारांनी हे उत्तर दिले आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.
अमेठी जिल्ह्यातील जगदशपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेश पासी यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत ते म्हणतात की, मला मुस्लिम मतांची गरज नाही. ना मी मुसलमानांच्या घरी जातो, ना यापुढे जाईन. इतकेच नाही तर मी मशिदीत कधी गेलो नाही आणि कुठल्याही मुस्लिम समाजाच्या सुखदुखात सहभागी होत नाही असं त्यांनी म्हटलं. २० सेकंदाच्या या व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय खळबळ माजली. या व्हिडिओवरून भाजपावर चहुबाजूने टीका होऊ लागली तेव्हा पक्षाने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत हात वर केले.
आमदारांच्या विधानाशी पक्षाची विचारधारा यांचा संबंध नाही. भाजपा सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यावर काम करते. ही पक्षाची ठाम भूमिका आहे. त्यामुळे आमदार सुरेश पासी यांनी जे काही विधान केले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही असं भाजपा जिल्हाध्यक्ष सुधांशु शुक्ला यांनी स्पष्ट केले. मुस्लिम मतांवरून भाजपा आमदाराने केलेले हे विधान पक्षाला महागात पडण्याची चिन्हे आहेत. आमदाराच्या या विधानावरून विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडले.
This is the kind of leaders that change the course of history. He is Suresh Pasi, MLA from @BJP4UPpic.twitter.com/C0k0THDGUx
— Neeraj Atri (@AtriNeeraj) January 8, 2026
सुरेश पासी यांचं विधान राजकीय आहे. जेव्हाही निवडणुका येतात तेव्हा भाजपा नेते अशी वक्तव्ये करत असतात. ते मते मिळवण्यासाठी भावाला भावाशी, एका धर्माला दुसऱ्या धर्माशी आणि एका जातीला दुसऱ्या जातीशी भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. ही सर्व नाटके आहेत अशी टीका काँग्रेसने केली. तर अशी विधाने करून समाजात फूट पाडण्याचे काम भाजपा करते. हिंदू मुस्लीम मतांची विभागणी करणे हे भाजपाचे राजकारण आहे. मतांसाठी भाजपा कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकते हे सुरेश पासी यांनी दाखवून दिले असं समाजवादी पक्षाचे नेते राम उदित यादव यांनी म्हटलं.