कोणीही विरोध केला तरी अलमट्टीच्या उंचीवर ठाम, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:52 IST2025-05-24T13:49:35+5:302025-05-24T13:52:04+5:30
केंद्राकडे अधिसूचनेसाठी दबाव टाकणार

कोणीही विरोध केला तरी अलमट्टीच्या उंचीवर ठाम, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्ट मत
शिरगुपी : कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्यासाठी केंद्राने अधिसूचना करावी, यासाठी जलसंपदा विभागाकडे दबाव टाकला आहे. कोणत्याही राज्याने कितीही विरोध केला तरी अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्यावर कर्नाटक सरकार ठाम असल्याचे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले.
कोल्हार (जि. बागलकोट) येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, बेळगाव, विजापूर, बागलकोट व रायचूर जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांना जमिनीबरोबरच मोठ उद्योगधंद्यासाठी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्याचा संकल्प केला आहे.
यासाठी लवकरच केंद्रीय जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यांची कृष्णा लवादाच्या पाणी वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी कर्नाटकाची बाजू ठामपणे मांडून कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्यासाठी केंद्र शासनावर दबाव टाकणार आहे.
ते म्हणाले, अलमट्टी जलाशयाच्या व्याप्तीत येणाऱ्या व बेळगाव, विजापूर, बागलकोट, रायचूर जिल्ह्यांतील अनेक महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शेतकऱ्यांच्या दोन्ही हंगामांतील पिकाला पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृष्णा भाग जलनिगमच्या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी कर्नाटक शासनाकडून सर्वच अंदाजपत्रकात कोट्यवधी रुपयांचे अनुदान ठेवण्यात आले आहे.
भाजप सरकार योजना पूर्ण करण्यासाठी अपयश ठरल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर खोटे-नाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन आरोप सिद्ध करून दाखवावे.
कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच येईल
सध्याच्या आमच्या सरकारने दोन वर्षे पूर्ण करून सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांना अनेक महत्त्वाकांक्षी योजना देण्याबरोबरच त्यांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कायम प्रयत्नशील आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार असल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.