एकही भाविक कुंभमेळ्यात राहणार नाही उपाशी; प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:22 IST2025-01-13T11:20:36+5:302025-01-13T11:22:13+5:30
पुण्य मिळविण्यासाठी अनेक संस्था करणार अन्नदान; आज सुरू होणार श्रद्धेचा महाकुंभ

एकही भाविक कुंभमेळ्यात राहणार नाही उपाशी; प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन
- राजेंद्र प्रसाद
प्रयागराज : प्रयागराजमधील संगमावर जगातील सर्वांत मोठे तंबूचे शहर तयार झाले आहे. या संगमाच्या काठावर सोमवारपासून श्रद्धेचा सर्वांत मोठा महाकुंभ सुरू होत आहे. या महाकुंभात देशभरातून आणि जगाच्या कोनाकोपऱ्यांतून सुमारे ४० ते ४५ कोटी भाविक त्रिवेणीच्या पवित्र संगमात स्नान करण्यासाठी येणार आहेत.
जगातील या सर्वांत मोठ्या धार्मिक सोहळ्यात स्नानाबरोबरच दानालाही विशेष महत्त्व आहे. येथे विशेषत: अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. यामुळेच या भव्य सोहळ्यात शेकडो संस्था महाकुंभ मेळाव्यात अन्नदान करणार आहेत. यासोबतच सनातन धर्माचा ध्वज वाहणारे १३ आखाडेही आपापल्या छावण्यांमध्ये भाविकांना अन्नदान करणार आहेत. या मोफत अन्नदानामुळे महाकुंभ मेळाव्यात एकही भाविक उपाशी राहणार नाही.
शेकडो रोट्या एकाच वेळी भाजल्या जातात
प्रत्येक आखाड्याच्या स्वयंपाकघरात दररोज चार ते पाच हजार लोकांसाठी भंडारा तयार केला जातो. सुमारे ७० ते ८० जणांची टीम आणि दीड ते दोन डझन स्वयंपाकी भंडारा तयार करतात.
प्रत्येक आखाड्याने स्वयंपाकासाठी देशी तुपापासून मसाल्यापर्यंत सर्व काही आणले आहे. वेगवेगळ्या राज्यातील शेफ जगभरातील पदार्थ तयार करतात. ऋषी-मुनींना उत्तम भोजन मिळणे हे त्यांच्या साधनेचे आणि कुंभमेळ्याचे पुण्य आहे, असे हे स्वयंपाकी सांगतात.
रांगेत लहान-मोठा असा कोणीही नाही
१३ आखाड्यांच्या छावणीत जमलेल्या भाविकांच्या रांगेत कोणीही लहान-मोठा नाही. सर्व भाविकांना एकाच रांगेत जेवण आणि प्रसाद मिळतो. या रांगेत ऋषी-मुनी यांच्या व्यतिरिक्त सर्व सामान्य भक्त आणि साधकही आहेत.
आखाड्यांमध्ये सुरुवातीपासून भंडारा संपेपर्यंत कोणीही उभा राहू शकतो. या आखाड्याच्या स्वयंपाकघरात फक्त पुरी-भाजी आणि खिचडीच नाही तर डोसा, छोले-भटुरे, रोट्या, हलवा आणि मिठाईही तयार केली जाते. निरंजनी आखाड्याच्या महंतांनी सांगितले की, साधूंच्या आवडीनुसार जेवण तयार केले जाते.
निर्मल पंचायती आखाड्यात सांगितले गेले की, साधूसंतांना त्यांच्या आवडीचे जेवण मिळावे यासाठी पिन्नीपासून श्रीखंडापर्यंत विविध मिठाई बनविल्या जातात, तर बडा उदासीन आखाड्यात भाज्यांसारखे इतर पदार्थही रोज बदलतात, इथे पकोडे, हलवा, जिलेबी, इमरती असे पदार्थ न्याहारीसाठी केले जातात.
महाकुंभात पुतळा अन् वाद
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री संगममध्ये स्नान करण्यासाठी येणार आहेत. समाजवादी पार्टी (सपा) समर्थकांनी महाकुंभ परिसरातील सेक्टर १६ मध्ये सपा संस्थापक आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचा पुतळा बसविला आहे. त्यावरून वाद सुरू झाला आहे.
४,०००
हेक्टरवर यावेळी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा कुंभमेळ्याचे क्षेत्रफळ जवळजवळ २५ टक्क्यांनी वाढले आहे.
१२
किलोमीटर लांबी घाटांची यावेळी आहे. मागील वेळी ती ८ किलोमीटर होती.
१८५०
हेक्टरपर्यंत पार्किंग क्षेत्र यावेळी वाढविण्यात आले आहे. २०१९ मध्ये ते १२९१ हेक्टर होते.