नितीश कुमार यांना पुन्हा बिहारचं मुख्यमंत्रिपद, तर भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:55 IST2025-11-19T14:44:22+5:302025-11-19T14:55:23+5:30
Bihar Assembly Election 2025: यावेळी भाजपा बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार का, याबाबत कुजबूज सुरू होती. मात्र आता नितीश कुमार हेच पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले आहे. तर भाजपाने यावेळीही दोन उपमुख्यमंत्री देण्याचं निश्चित केलं आहे.

नितीश कुमार यांना पुन्हा बिहारचं मुख्यमंत्रिपद, तर भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत ८९ जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर जनता दल युनायटेड पक्ष ८५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे यावेळी भाजपा बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार का, याबाबत कुजबूज सुरू होती. मात्र आता नितीश कुमार हेच पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले आहे. तर भाजपाने यावेळीही दोन उपमुख्यमंत्री देण्याचं निश्चित केलं असून, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड केली आहे.
बिहारमध्ये नव्या सरकारची स्थापना करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जेडीयू आणि भाजपाच्या आमदारांच्या विधिमंडळ गटाची बैठक आज बोलावण्यात आली होती. त्यापैकी भाजपाच्या बैठकीमध्ये सम्राट चौधरी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपाने उपमुख्यमंत्रिपदासाठी आपल्या जुन्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवताना सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
दरम्यान, आज दुपारी बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या आमदारांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीमध्ये नितीश कुमार यांची एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे.