नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:44 IST2025-11-19T16:43:40+5:302025-11-19T16:44:26+5:30
Nitish Kumar News: आजच्या NDA च्या बैठकीत नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले.

नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
Nitish Kumar News:बिहारमधील नवीन एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा उद्या (20 नोव्हेंबर) पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी, आज NDA ची महत्वाची बैठक पार पडली, ज्यात नितीश कुमारयांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले आहे. म्हणजेच, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.
सम्राट चौधरींनी प्रस्ताव मांडला.
एनडीए आमदारांची बिहार विधानसभेच्या इमारतीत बैठक झाली. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर करण्यात आला. आता नितीश कुमार राजभवनात जाऊन राजीनामा देतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. तर, उद्या सकाळी भव्य शपथविधी सोहळ्यात 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिंहा उप-मुख्यमंत्रिपदाची शपत घेतली.
गांधी मैदानावर शपथविधी सोहळा
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाची व्यापक तयारी सुरू आहे. एनडीएचे अनेक वरिष्ठ नेतेही या समारंभात सहभागी होतील. स्वतः नितीश कुमारांनी मंगळवारी या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गांधी मैदानाला भेट दिली होती.
बिहार विधानसभा निकाल
14 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये एनडीएने ऐतिहासिक कामगिरी करत एकूण 202 जागा जिंकल्या. यात भाजपने 89 जागांवर प्रचंड विजय मिळवला आणि राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. तर, नितीश कुमार यांच्या जेडीयूने 85 जागा जिंकल्या. याव्यतिरिक्त, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (राम विलास) चाही स्ट्राइक रेट चांगला होता. पक्षाने 29 जागा लढवल्या आणि 19 जागा जिंकल्या. तर, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM) ने पाच आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमने चार जागा जिंकल्या. दुसरीकडे, महाआघाडीला फक्त 35 जागा मिळाल्या.