२०२४च्या निवडणुकीसाठी नितीश कुमारांकडे मोठी जबाबदारी, विरोधी पक्षांच्या बैठकीत झाला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 15:41 IST2023-06-23T15:41:07+5:302023-06-23T15:41:49+5:30
Nitish Kumar: पाटणा येथे होत असलेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी एक मोठा निर्णय घेतला असून, नितीश कुमार यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या एकतेसाठी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

२०२४च्या निवडणुकीसाठी नितीश कुमारांकडे मोठी जबाबदारी, विरोधी पक्षांच्या बैठकीत झाला निर्णय
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्ष आज पाटण्यामध्ये एकत्र आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या बैठकीमध्ये काँग्रेस, आप, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक प्रमुख पक्ष सहभागी झाले आहेत. या बैठकीत विरोधी पक्षांनी एक मोठा निर्णय घेतला असून, नितीश कुमार यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या एकतेसाठी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार हे विरोधी ऐक्यासाठी बनणाऱ्या आघाडीचे मुख्य कर्तेधर्ते असतील. ते सर्व पक्षांमध्ये समन्वय स्थापन करण्यसाठी रणनीती आखतील. नितीश कुमार यांच्या नावावर सर्व पक्षांच्या प्रमुखांनी सहमती व्यक्त केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.
या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय निर्णय घेण्यासाठी नितीश कुमार यांना नियुक्त करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी होणाऱ्या आगामी बैठका आणि सर्व राजकीय निर्णयांसाठी नितीश कुमार हे जबाबदार असतील.
काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी नितीश कुमार यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यानंतर इतर पक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पाटणा येथे होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला बीआरएस अनुपस्थित होती. बीआरएसचे नेते टी.आर. रामाराव यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सूचक विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, नितीश कुमार हे खूप चांगले नेते आहेत. मात्र आमच्यासाठी काँग्रेससोबत एकाच मंचावर येणं शक्य नाही. ज्या बैठकीत काँग्रेस असेल तिथे आम्ही असू शकत नाही. देशाच्या सध्याच्या स्थितीसाठी काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही काँग्रेसला माफ करू शकत नाही. आम्ही भाजपा आणि काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, असे रामाराव यांनी स्पष्ट केले.