NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:46 IST2025-11-21T12:41:10+5:302025-11-21T12:46:43+5:30
Red Fort Blast: एनआयएने हरयाणातील फरिदाबादमध्ये टाकलेल्या धाडीनंतर दोन डॉक्टरांना ताब्यात घेतले. हे दोन्ही डॉक्टर अल फलाह विद्यापीठाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
Delhi Bomb Blast News in Marathi: दिल्लीत कारमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास करत असलेल्या एनआयएने आणखी दोन संशयित डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांना शब्बीर नावाच्या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली होती. त्याच्या घराची पथकाने झाडाझडती घेतली. याच एनआयएने कारवाई करत अल फलाह विद्यापीठाशी संबंधित दोन डॉक्टरांना ताब्यात घेतले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने गुरुवारी दुपारी हरयाणातील फरिदाबादमध्ये असलेल्या धौज गावात धाड टाकली. शब्बार नावाच्या व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली. सध्या त्याची चौकशी केली जात आहे.
दिल्लीस्फोट प्रकरणात एनआयएने अल फलाह वैद्यकीय विद्यापीठातील दोन डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. डॉ. जुनैद युसूफ आणि डॉ. नासिर राशीद अशी दोन्ही संशयितांची नावे आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. दोन्ही डॉक्टरांकडून गोपनीय कारवायांबद्दलची माहिती घेण्याचे प्रयत्न अधिकारी करत आहेत.
तीन राज्यांमध्ये कनेक्शन
दिल्लीत झालेल्या स्फोटाचे धागेदोरे तीन राज्यात आढळून आले आहेत. अल फलाह विद्यापीठ या स्फोटामुळे चर्चेत आले असून, या विद्यापीठात होत असलेल्या घडामोडींची आता फरिदाबाद पोलिसांची एसआयटी चौकशी करत आहे. याच विद्यापीठातील अनेक डॉक्टरांना अटक केली गेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एका टॅक्सी चालकाला, एक मौलवी आणि ऊर्दू शिक्षकालाही ताब्यात घेतले आहे.