नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:14 IST2025-12-10T19:13:41+5:302025-12-10T19:14:35+5:30
याला म्हणतात मत चोरी... देशात केव्हा झाली पहिली मत चोरी...? इंदिरा गांधींचा उल्लेख करत काय म्हणाले अमित शाह...?

नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी SIR संदर्भाती चर्चेदरम्यान 'मत चोरी'च्या (Vote Theft) मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर थेट निशाणा साधला. गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधक मत चोरीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. दरम्यान आज शाह यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचे नाव घेत मत चोरी संदर्भात भाष्य केले.
याला म्हणतात मत चोरी -
शाह म्हणाले मत चोरीचे तीन प्रकार असतात, पहिला प्रकार म्हणजे, पात्रत नसतानाही मतदार बनणे. दुसरे म्हणजे, अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकणे आणि तिसरे म्हणजे, मतांच्या विरोधात पद मिळवणे. हे तिनही प्रकार मत चोरीच्या कक्षेत येतात.
देशात केव्हा झाली पहिली मत चोरी? -
शाह म्हणाले, जेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान निवडण्याची वेळ आली, तेव्हा पहिली मतचोरी झाली. तेव्हा देशात जेवढे प्रांत होते, तेवढेच काँग्रेसचे प्रांताध्यक्ष होते. त्यांच्या मतांवरून देशाचा पहिला पंतप्रधान ठरणार होता. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना २८ मते मिळाली, तर जवाहरलाल नेहरू यांना केवळ दोन मते मिळाली. मात्र, तरीही पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बनले. यानंतर कांँग्रेस खासदारांनी सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली.
इंदिरा गांधींचा उल्लेख करत काय म्हणाले अमित शाह? -
शाह पुढे म्हणाले, दुसऱ्या प्रकारची मत चोरी म्हणजे, 'अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकणे'. श्रीमती इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडून आल्यानंतर, श्री राजनारायण यांनी निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हणत, अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर, न्यायालयाने इंदिरा गांधी यांनी योग्य पद्धतीने निवडणूक जिंकली नाही, असे म्हणत ती निवडणूकच रद्द केली. ही देखील खूप मोठी मत चोरी होती. ही मत चोरी झाकण्यासाठी नंतर, पंतप्रधानांविरुद्ध कोणताही खटला चालवला जाऊ शकत नाही, असा कायदा संसदेत आणला गेला. अर्थात, इंदिरा गांधी यांनी स्वतःलाच कायदेशीर संरक्षण देण्याचे काम केले, असेही शाह म्हणाले.
पात्रता नसतानाही मतदार होणे -
शाह म्हणाले, मत चोरीचा तिसरा प्रकार म्हणजे, 'पात्र नसतानाही मतदार होणे'. या संदर्भात बोलताना शाह यांनी एका न्यायालयीन वादाचा उल्लेख केला. ते म्हणाले, सोनिया गांधी या भारताच्या नागरिक बनण्यापूर्वीच मतदार बनल्या होत्या. असे प्रकरण दिल्लीच्या एका दिवाणी न्यायालयात, दाखल झाले आहे. यासंदर्भात आता त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे.