NDA 261 and UPA 167 seats win in loksabha 2019 by numerology prediction | अंकशास्त्रानुसार एनडीएला 261 तर यूपीएला 167 जागांचा अंदाज 
अंकशास्त्रानुसार एनडीएला 261 तर यूपीएला 167 जागांचा अंदाज 

जालंधर - देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाला घेऊन विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. ज्योतिषी आणि अंकशास्त्रानुसार प्रत्येक जण विविध राजकीय पक्ष आणि त्यांना मिळणाऱ्या जागांची भविष्यवाणी करत आहे. राजस्थानमधील अंकशास्त्रज्ञ डॉ. कुमार गणेश यांच्यानुसार केंद्रामध्ये एनडीएला 261 जागा मिळण्याची भविष्यवाणी केली आहे. भाजपा स्वबळावर केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी अपयशी ठरेल. एनडीएच्या एकूण 261 जागांमध्ये भाजपाच्या 210 जागा असतील. त्याचसोबत शिवसेना 10, जेडीयू 10, अण्णा द्रमुक 12, पीएमके 3 अशा जागा असतील. हे सगळे पक्ष सत्ताधारी भाजपाचे घटकपक्ष आहेत. 

तर दुसरीकडे डॉ कुमार यांनी यूपीएला 167 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात काँग्रेसला 118 जागा मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. नॅशनल कॉन्फरन्स 2, जेडीएस 3, राष्ट्रवादी काँग्रेस 13, द्रमुक 15 जागा असा अंदाज आहे. हे सर्व पक्ष यूपीएचे घटकपक्ष आहेत. आणि इतर पक्षांमध्ये तेलुगू देसम पार्टीला 8, वायएसआर काँग्रेसला 13, समाजवादी पक्ष 16, बसपा 15, राष्ट्रीय लोकदल 1, सीपीआय 3, सीपीएम 10, बीजू जनता दल 10, तृणमूल काँग्रेस 18 जागा जिंकेल असं सांगितले आहे. 

उत्तर प्रदेशामधील एकूण 80 जागांपैकी भाजपाला 39, समाजवादी पार्टी 16, बसपा 15, काँग्रेस 8 आणि इतर 2 जागा मिळतील. महाराष्ट्रात एकूण 48 जागांपैकी भाजपा-शिवसेनेला प्रत्येकी 10 जागा, काँग्रेसला 14, राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा मिळतील. बिहारमधील 40 जागांपैकी भाजपाला 12, जेडीयू 10, लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला 8, काँग्रेस 4, तर लोकजनशक्ती पार्टीला 3 जागा मिळतील. मध्य प्रदेशात 29 जागांपैकी 19 जागा भाजपाला तर 10 जागा काँग्रेसला मिळतील. ओडिशामध्ये बीजू जनता दलाला 10, भाजपाला 8 आणि काँग्रेसला 3 जागा दिल्या आहेत. ही भविष्यवाणी अंकशास्त्रानुसार केली आहे. प्रत्यक्षात निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. त्यामुळे एक्झिट पोल खरे ठरतील, भविष्यवाणी खरी ठरेल की निकाल उलटेच लागतील हे सगळे तर्क 24 तासानंतर स्पष्ट होतील. 
 


Web Title: NDA 261 and UPA 167 seats win in loksabha 2019 by numerology prediction
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.