गुजरातमधील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:56 IST2017-12-21T17:51:38+5:302017-12-21T17:56:39+5:30
गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नवविनर्वाचित आमदार कांधल जडेजा यांना अटक करण्यात आली आहे. कांधल जडेजा यांच्यावर पोरबंदर जिल्ह्यात दंगल घडवल्याचा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

गुजरातमधील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराला अटक
अहमदाबाद - गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नवविनर्वाचित आमदार कांधल जडेजा यांना अटक करण्यात आली आहे. कांधल जडेजा यांच्यावर पोरबंदर जिल्ह्यात दंगल घडवल्याचा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप आहे. कांधल जडेजा यांच्यासहित सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोरबंदर जिल्ह्यात मतदानावरुन झालेल्या भांडणानंतर कांधल जडेजा यांनी समर्थकांसोबत पोलीस ठाण्यात जाऊन अधिका-यांना मारहाण करत सरकारी संपत्तीचं नुकसान केलं होतं अशी माहिती पोलीस अधिक्षक शोभा यांनी दिली आहे.
कांधल जडेजा आपले दोन भाऊ करण जडेजा, काना जडेजा आणि डझनभर कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यात घुसरले होते. त्यांचा राजकीय शत्रू म्हणून ओळखल्या जाणा-या सम्राट गोगान यांनी हल्ल्याच्या भीतीने पोलीस ठाण्यात आश्रय घेतला होता. कांधल जडेजा समर्थकांसोबत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती त्यांना होती. बुधवारी कांधल जडेजा यांनी पोलीस ठाण्यात घुसून त्यांना मारहाण केली होती.
'आरोपींनी गोगान आणि पोलीस ठाण्यात उपस्थित अधिका-यांना मारहाण केली. यानंतर त्यांनी राडा करत पोलीस ठाण्यातील सामानाची तोडफोड केली', अशी माहिती पोलीस अधिकारी एन डी परमार यांनी दिली.
गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या वादानंतर कांधल जडेजा सम्राट गोगान यांचा शोध घेत होता. त्याच्या भीतीने सम्राट गोगान यांनी पोलीस ठाण्यात आश्रय घेतला होता. सम्राट गोगान यांनी कांधल जडेजा यांच्या इच्छेविरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण यानंतरही वाद संपला नाही आणि मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचलं.
जडेजा आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत कांधल जडेजा यांनी भाजपाच्या उमेदवाराचा 23 हजार मतांनी पराभव करत निवडणूक जिंकली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ते एकमेव विजयी उमेदवार आहेत.