Narendra Modi : "लोकांच्या जमिनी घुसखोरांना देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली"; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:43 IST2026-03-13T17:43:04+5:302026-03-13T17:43:45+5:30
Narendra Modi And Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Narendra Modi : "लोकांच्या जमिनी घुसखोरांना देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली"; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकराझार जिल्ह्यात ४,५७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने लोकांच्या जमिनी घुसखोरांना देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, असं म्हणत पंतप्रधानांनी निशाणा साधला. आगामी निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवा आणि घुसखोरांसाठी इथे कोणतीही जागा नाही, असा स्पष्ट संदेश द्या, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा तुम्ही देश आणि आसाम या दोन्ही ठिकाणांहून काँग्रेसला हाकलून लावलं आणि भाजपा-एनडीएला संधी दिली, तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केले. काँग्रेसने आपल्या स्वार्थी राजकारणासाठी विविध समाजांमध्ये फूट पाडली, मात्र भाजपाने कायमस्वरूपी शांततेसाठी काम केलं. याच विचारातून 'बोडो शांतता करार' करण्यात आला."
Assam: PM Narendra Modi says, "When you rejected the Congress both at the national level and in Assam, and gave an opportunity to the BJP-NDA, we sincerely began our efforts..." pic.twitter.com/l9uxxClbl0
— IANS (@ians_india) March 13, 2026
"फक्त बॉम्ब आणि बंदुकीचे आवाज घुमत होते"
"या करारामध्ये पहिल्यांदाच सर्व प्रमुख संघटना आणि गटांना एकत्र आणलं गेलं. काँग्रेसने बोडोलँडच्या अनेक पिढ्यांना खोट्या स्वप्नांमध्ये अडकवून ठेवलं होतं. दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या सरकारने केवळ दिखाव्यासाठी कागदोपत्री करार केले. कोकराझारसह या संपूर्ण भागाने गेल्या दशकांमध्ये खूप काही सोसलं आणि गमावलं आहे. आम्ही तो कठीण काळ पाहिला आहे, जेव्हा या ठिकाणी फक्त बॉम्ब आणि बंदुकीचे आवाज घुमत होते. पण आज हे चित्र बदलत आहे. आज बोडोलँड शांतता आणि विकासाच्या मार्गावर चालली आहे. आसाम आज शांती आणि विकासाचा नवा अध्याय लिहित आहे."
"काँग्रेस म्हणजे खोट्या आश्वासनांचं दुकान"
पंतप्रधान मोदींनी टोला लगावला की, "काँग्रेस म्हणजे खोट्या आश्वासनांचं दुकान आहे, जे एका खोट्या आश्वासनासोबत ४ 'सुपर खोटं' भेट म्हणून देतात. कारण ती आश्वासनं पूर्ण करण्याचा काँग्रेसचा कोणताही हेतू नसतो. दुसरीकडे तुमच्यासमोर भाजपा-एनडीएचे मॉडेल आहे. आमच्या डबल इंजिन सरकारने जे सांगितलं, ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आसामचा वारसा जपण्यासाठी आणि वेगवान विकासासाठी आमचं सरकार सातत्याने काम करत आहे."