मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:07 IST2025-11-25T17:04:25+5:302025-11-25T17:07:03+5:30
Muskan Rastogi Latest News: निळ्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह पुरून बॉयफ्रेंडसोबत फरार झालेली मुस्कान रस्तोगी सध्या तुरुंगात आहे. अटक झाली तेव्हाच ती गर्भवती असल्याचे समोर आले होते. आता तिने बाळाला जन्म दिला आहे.

मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
Muskan Rastogi Child News: मुस्कान रस्तोगीचे नाव देशभरात पोहोचले. तिने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या करून त्याला पाण्याच्या ड्रममध्ये पुरले होते. याच हत्याकांडामुळे ती चर्चेत आली. तुरुंगात असलेली मुस्कान रस्तोगी गर्भवती होती. तिने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी बाळाला जन्म दिला आहे. प्रसुतीसाठी मुस्कानला रुग्णालयात नेण्यात आले होते. सध्या ती रुग्णालयातच आहे, पण यानिमित्ताने एक प्रश्न चर्चेत आला आहे की, तुरुंगात जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो?
भारतात आता गर्भवती महिलांची प्रसुती तुरुंगात केली जात नाही. तुरुंगात असलेल्या महिलेला प्रसुतीची वेळ जवळ आली की, रुग्णालयात नेले जाते. प्रसुती झाल्यानंतर काही आठवडे आई आणि बाळाला रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते.
तुरुंगामध्ये लहान मुलांची काळजी कशी घेतली जाते?
त्यानंतर कैदी महिला आणि बाळाला पुन्हा तुरुंगात नेण्यात येते. महिला वार्डमध्ये अशा महिलांची व्यवस्था केली जाते. दुसरं म्हणजे कैदी महिलेला अटक होण्यापूर्वीच बाळ झालेलं असेल, तर ते ६ वर्षांचं होईपर्यंत आईसोबत ठेवले जाते. दिल्लीतील तिहार आणि मंडोलीतील तुरुंगात ६ वर्ष वयाच्या आतील अनेक महिला कैद्यांची मुले तुरुंगात आहेत.
बहुतांश मोठ्या तुरुंगामध्ये महिला कैद्यांच्या मुलांसाठी संगोपन केंद्र चालवले जाते. तिथे त्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. इथे मुलांना खेळणे, चित्र काढणे, संगीत शिकणे अशा गोष्टी शिकवल्या जातात. त्यांचा विकास सामान्य मुलांप्रमाणेच व्हावा, याची काळजी घेतली जाते.
लसीकरण, वाढदिवस, खेळणी आणि कपडे
तुरुंगात शिक्षित कैदी असतील, तर त्यांना आणखी प्रशिक्षण देऊन याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते. तुरुंगात तयार करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर मुलांना बीसीजी, पोलिओ, हेपेटायटीस, डीपीटी आणि टिटनेस अशा लसी दिल्या जातात. तुरुंगात असलेल्या आई आणि बाळांची वेळोवेळी आरोग्य तपासणीही केली जाते.
तुरुंगात आईसोबत असलेल्या मुलांना दररोज दूध दिले जाते. फळे देण्याचीही व्यवस्था असते. अशा मुलांचा तुरुंगात वाढदिवसही साजरा केला जातो. या मुलांना खेळणी, नवीन कपडेही दिले जातात. पण, वयाच्या ६ व्या वर्षापर्यंतच ही मुले आईसोबत राहू शकतात. त्यानंतर तुरुंग प्रशासन अशा मुलांच्या नातेवाईकांना संपर्क करते. जर मुलाचे कुणी नातेवाईक नसतील किंवा कुणी त्याला स्वीकारायला तयार नसतील, तर त्यांना बालसंगोपण केंद्र, अनाथ आश्रमात पाठवले जाते आणि त्यांच्या भविष्यातील गरजांची व्यवस्था केली जाते.