MP Kangana Ranaut: हिमाचल प्रदेशातीलमंडी येथे पावसामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झालं. ढगफुटीच्या घटनांमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक खासदार कंगना राणौत मदतीसाठी न पोहोचल्याने लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता कंगना राणौत तिच्या संसदीय मतदारसंघ मंडीमध्ये पोहोचल्या आहेत. सोमवारी कंगनाने मंडीमधील आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. मात्र यावेळी स्थानिकांनी तिला चांगलेच फटकारले. इथे काय फोटो काढायला आलात का असा सवाल करत आपत्तीग्रस्तांनी आपली नाराजी व्यक्त केली.
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सेराज या पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पोहोचली होती. यावेळी एका स्थानिक महिलेने कंगनावर आपला राग काढला. "तू फक्त तुझा फोटो काढायला आली आहेस का? असं काही घडलं की तू दोन माणसांना पकडतेस, तुझा फोटो काढतेस आणि निघून जातेस," असं त्या महिलेने म्हटलं. महिलेच्या संतापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावर कंगनाने त्या महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. "सर्वजण फक्त कंगना-कंगना बोलत राहतात. माझ्याकडे कोणते मंत्रिमंडळ आहे का? माझे दोन भाऊ माझ्यासोबत असतात. मला कोणताही मदत निधी मिळत नाही. मी एक विशेष पॅकेज (निधी) आणेन, पण काँग्रेसचे सरकार तो गिळून टाकेल," असं कंगना म्हणाली.
गेल्या काही दिवसांमध्ये मंडीमध्ये १६ ठिकाणी ढगफुटी झाल्या आहेत. या पुरामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण अजूनही बेपत्ता आहेत. पुरामुळे झालेले नुकसान पाहिल्यानंतर खासदार कंगना ६ जुलैपासून पूरग्रस्त भागांना भेट देत आहे. कंगना राणौतला तिच्या दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. 'मी मंडी परिसरात फिरत होते. यादरम्यान माझ्या गाडीवर दगड पडला. हिमाचलमध्ये प्रवास करण्यासाठी हा काळ सुरक्षित नाही,' असं कंगनाने म्हटलं. यानंतर, लोकांनी कंगनाला मंडीतील पूरग्रस्त भागात न गेल्याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी मला यावर भाष्य करायचे नाही. आम्ही इथे आहोत. ज्यांना काळजी आहे त्यांच्यासोबत जगण्यासाठी आणि मरण्यासाठी आम्ही इथे आहोत. ज्यांना काळजी नाही त्यांच्याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही, असं म्हटलं. यावर उत्तर देताना कंगनाने'मी सेराज आणि मंडीच्या पूरग्रस्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण जयराम ठाकूर यांनी मला रस्ते पूर्ववत होईपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला होता,' असं म्हटलं.
दरम्यान, गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी शिमला येथील समेज, कुल्लू येथील बागीपुल आणि मंडी येथील एका गावात ढगफुटी झाली होती. पुरात सुमारे ५१ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही कंगना अनेक दिवस आपत्तीग्रस्तांना भेटायला गेली नव्हती. त्यावेळी कंगनाने 'मी पूरग्रस्त भागातील आमदार आणि अधिकाऱ्यांनी बोलले, त्यांनी मला सध्या हिमाचलला न येण्याचा सल्ला दिला आहे, कारण अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे,' असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना काही दिवसांनी पूरग्रस्त भागात पोहोचली होती.तिने सांगितले की, काँग्रेसच्या सुखू सरकारने मला पूरग्रस्त भागात जाण्यापासून रोखले होते.